कोल्हापूर : नव्या हिरकणीतून आता आजरेकर करणार आरामदायी प्रवास | पुढारी

कोल्हापूर : नव्या हिरकणीतून आता आजरेकर करणार आरामदायी प्रवास

सोहाळे; सचिन कळेकर : आजरा आगारात एसटी बसची संख्या फारच कमी असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर फरफट होत होती. मागणी करुनही गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन बसेस आगाराला मिळाल्या नाहीत. त्यातच जुन्या व मोडकळीस आलेल्या पावसाळ्यात गळणाऱ्या, कधीकधी लांब पल्ल्याच्या मार्गावर बंद पडणाऱ्या एसटी बसेसमधूनच आजरा तालुकावासियांना प्रवास करावा लागत होता.
याबाबतचे सविस्तर वृत्त ‘दै. पुढारी’ ने प्रसिध्द केले होते. याची दखल घेत शासनाने आजरा आगाराला नवीन पाच बसेस दिल्या आहेत. त्यामुळे आता नव्याने मिळालेल्या हिरकणी आरामदायी बसेसमधून तालुकावासियांना प्रवास करता येणार आहे. नव्याने पाच हिरकणी बस आजरा आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्याने तालुक्यातील प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

आजरा आगाराकडे ३६ बसेस असून त्यातील तीन बसेस काही दिवसात स्क्रॅप होणार आहेत. सध्या असणाऱ्या बस जून्या असून काही ना काही लहान मोठ्या समस्या उद्भवत आहेत. लांब पल्ल्यावर गाड्या सोडल्यास कधीकधी अचानकपणे बंद पडत आहेत. परिणामी याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत आहे. याचा आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होताना दिसत असल्याने आगार प्रशासनाकडून नवीन १० बसेस आगाराला मिळाव्यात, अशी मागणी केली होती. याबाबतचा प्रस्तावही यापुर्वीच पाठविण्यात आला होता. मात्र शासनाकडून याला प्रतिसाद मिळाला नाही.

‘दै. पुढारी’ ने गेल्या महिन्यात (दि. २८ जून) लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही जुन्याच बसेस, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत शासनाने आजरा आगाराला नवीन हिरकणी पाच बसेस दिल्या आहेत. याकरिता आमदार प्रकाश आबिटकर यांनीही पाठपुरावा केला आहे. त्यामुळे उद्घोषणेपासून पॅनिक बटनपर्यंत सर्व प्रकारची सुविधा प्रवाशांना नव्या हिरकणीत मिळणार आहे. विशेष म्हणजे बसची आसनक्षमताही वाढवली आहे. आजरा आगाराच्या ताफ्यात ५ नवीन बसेस दाखल झाल्याने तालुक्यातील प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत असून दै. पुढारीचे कौतुक केले जात आहे.

अशी आहे नवी हिरकणी बस

एसटी प्रशासनाने हिरकणीचे रुप बदलले असून बसचा रंग पांढरा व गुलाबी केला आहे. आसन क्षमता ४५ केली आहे. अॅल्युमिनिअमचा पत्रा बदलून एमएसचा (माईल्ड स्टील) वापर करण्यात आल्याने बस खड्ड्यातूनही गेली तरी पाठीमागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांना हादरा बसत नाही. बसला आतून उघडणारे व बंद होणारे दरवाजे आहेत. वाहकाला सर्वात पुढे स्वतंत्र आसन आणि जवळच तिकीट मशिन चार्जिंगची सोय, आसनाजवळ मोबाईल चार्जिंगची सुविधा, चालक किंवा वाहकाला प्रवाशांना काही सुचना द्यायच्या असल्यास उद्घोषणा प्रणाली, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणची सोय आदी सुविधा हिरकणी बसमधून प्रवाशांना मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशीवर्गाचा प्रवासही सुखकर होण्यास मदत होणार आहे.

आमदार आबिटकर यांच्या हस्ते आज लोकार्पण

आगारात मिळालेल्या नवीन पाच बसेसचा लोकार्पण सोहळा आज रविवार (दि. ३०) बसस्थानक परिसरात दुपारी तीन वाजता होणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नवीन गाडीचे पूजन करुन लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख राजेंद्र घुगरे व कार्यशाळा अधिक्षक पृथ्वीराज चव्हाण यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

हेही वाचा : 

Back to top button