कोल्हापूर : गांजा पुरवठा करणार्‍या तस्कराचे नाव निष्पन्न; सीडीआर मागवला | पुढारी

कोल्हापूर : गांजा पुरवठा करणार्‍या तस्कराचे नाव निष्पन्न; सीडीआर मागवला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कळंबा कारागृहातील निलंबित सुभेदार बाळासाहेब गेंडकडे कैद्यांसाठी गांजा पुरविणार्‍या तस्कराचे नाव जुना राजवाडा पोलिसांच्या चौकशीत शनिवारी निष्पन्न झाले. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. संशयिताचा लवकरच छडा शक्य आहे. दरम्यान, सुभेदार व तस्कर यांच्यातील संभाषणाचे मोबाईल सीडीआर मागविण्यात येत आहेत. अहवाल उपलब्ध होताच प्रकरणाची व्याप्ती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांजाप्रकरणी दखल घेतली आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा तपासाधिकारी सतीश गुरव यांच्याकडून त्यांनी तपासाचा आढावा घेतला. सुभेदार गेंडला गांजा पुरवठा करणार्‍या संशयिताचे नाव निष्पन्न करून संबंधिताला तत्काळ अटक करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

गांजा कोठून, कोणामार्फत आणण्यात आला. गांजा तस्करीत आणखी कोणाची मध्यस्थी असावी का, कळंबा कारागृहातील किती कैद्यांना आजवर गांजा पुरवठा करण्यात आला होता, याचीही सखोल चौकशी करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत.

कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा पुरवठ्याचा प्रयत्न करणार्‍या सुभेदाराला रंगेहाथ जेरबंद करण्यात आले. पाठोपाठ घरझडतीत अडीच किलो गांजासाठा व 50 हजारांची रोकड आढळून आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती. जुना राजवाडा पोलिसांनी गेंडला अटक केली आहे. मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यास 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

सुभेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे

तपासाधिकारी गुरव व उपनिरीक्षक प्रितम पुजारी यांनी गेंड याच्याकडे चौकशी सुरू केली. प्रथमत: असहकार्याची भूमिका घेतली. मात्र, चौकशीच्या ससेमिर्‍यानंतर त्याने तोंड उघडले आहे. चौकशीत निष्पन्न होणार्‍या माहितीबाबत तपासाधिकार्‍यांनी गोपनियता पाळली आहे. मात्र, गांजा तस्कर हाती लागताच या प्रकरणाची व्याप्ती स्पष्ट होईल, असेही गुरव यांनी सांगितले. सुभेदार व तस्कराच्या संभाषणाचे मोबाईल सीडीआरही प्राप्त होतील.

Back to top button