कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची भारतीय फुटबाॅल संघात निवड | पुढारी

कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची भारतीय फुटबाॅल संघात निवड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : फुटबॉल पंढरी कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा अनिकेत जाधव याने रोवला. त्याची हँगजू (चीन) मध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार्‍या आशियाई गेम्स स्पर्धेसाठी आघाडीचा खेळाडू म्हणून भारतीय फुटबॉल संघात निवड झाली. या संघाची घोषणा शनिवारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने करण्यात आली.

अनिकेतच्या फुटबॉलची कारकीर्द बालेवाडी (पुणे) क्रीडा प्रबोधिनीतून झाली. 2017 मध्ये भारतात झालेल्या 17 वर्षांखालील फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर 2018-2019 दरम्यान त्याची इंडियन अर्रोज या व्यावसायिक फुटबॉल संघाकडून निवड झाली. त्यानंतर जमशेदपूर एएफसी, हैदराबाद एफसी, ईस्ट बेंगॉल, ओडिशा एफसी अशा देशांतील नामांकित फुटबॉल संघाकडून व्यावसायिक खेळाडू आणि त्याचबरोबर 2022 मध्ये बहरीन व बेलारूस येथे झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती.

आता चीन येथे होणार्‍या या स्पर्धेसाठी भारतीय संघात आघाडीचा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे त्याच्या शाहूपुरी, पाचव्या गल्लीतील घरात जल्लोष करण्यात आला असून कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button