कोल्हार : भगवंताने आपले म्हणावे अशी भक्ती करावी | पुढारी

कोल्हार : भगवंताने आपले म्हणावे अशी भक्ती करावी

कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संसारात अडचणींना तोंड देताना अनेकजण रडतात. परंतु भगवंतासाठी दोन अश्रू ढाळले तर भगवंत हजार अश्रूने त्या जीवासाठी रडतो . भगवंतासाठी जो रडतो त्याचे गीत होते , भक्ती अशी करावी की भगवंताने भक्ताला आपलं म्हणावं असा मौलिक उपदेश महंत रामगिरी यांनी केला . श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे अधिक मासानिमित्त भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या भागवत कथेचे सहावे पुष्प गुंफतांना रामगिरी महाराज बोलत होते. पाचव्या पुष्पात श्रीकृष्ण भगवंताच्या रासलीला, गोवर्धन लीला, याबाबत कथन केल्यानंतर सहावे पुष्प गुंफताना कंस वध, श्रीकृष्ण अक्रूर भेट व श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर या कथा सांगून उपस्थित जनसागराला मंत्रमुग्ध केले.

रामगिरी महाराज यांनी गोपिकांचा अहंकार जागृत झाल्यावर लगेच श्रीकृष्ण भगवान अदृश्य झाले. गोपिका रडू लागल्या, कंसाने अक्रूरला श्रीकृष्ण भगवंताला मथुरेत आणण्यासाठी वृंदावनात पाठवले. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचे दर्शन होणार या आनंदाने अक्रुराचे मन भरून आले. परंतु वृंदावन सोडून भगवान श्रीकृष्ण मथुरेत जाणार या चिंतेने मात्र सर्व गोपिका अस्वस्थ होऊन रडू लागल्या. यशोदा नंदलाल हेही अस्वस्थ झाले, सर्वांनी अक्रूरला मथुरेत जाण्यासाठी विरोध केला. भगवान श्रीकृष्ण आपल्याला सोडून जाणार हा विरह गोपिकांना सहन होत नव्हता हे सर्व दृश्य पाहून अक्रूर ही व्याकुळ झाला, त्याने यमुनेत स्नान केले.

त्यावेळी अक्रुराला यमुनेच्या पाण्यात श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्यामुळे अक्रूर जरी कृष्णाला घेऊन मथुरेला गेला असला, तरी आजही वृंदावनचे रहिवासी म्हणतात, आमचा कृष्ण वृंदावन सोडून गेला नाही, तो वृंदावनातच आहे. यशोदा, नंदबाबा व गोपिकांच्या विरहाचा प्रसंग ऐकताना उपस्थितांना गहिवरून आले. पुढे महाराजांनी कंस वधाची कथा सांगितली. श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर कथा सांगताना व्यासपीठावर स्वयंवराचा जीवंत देखावा सादर केला.

यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे व वर्षा निबे या दाम्पत्याला श्रीकृष्ण रुक्मिणी बनवून स्वयंवर लावण्यात आले. ग्रामगुरू पांडुरंग वैद्य यांनी मंगलाष्टके म्हटली तर ऋषिकेश खांदे व पप्पू मोरे यांनी मामाच्या भूमिकेत काम केले. लग्नात आहेर स्वीकारलेली रक्कम सरला बेट येथील गुरुकुलाला दान म्हणून देण्यात आली. वृंदावन येथील कृष्णकुमार यांनी अप्रतिम मयूर नृत्य सादर केले. कथा श्रवणासाठी सहाव्या पुष्पात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली. खा. विखे पाटील यांच्या हस्ते रामगिरी महाराजांचे पूजन केले. ग्रामस्थांच्या वतीने खा. सुजय विखे पा. यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामस्थांनी एकजुटीने रहावे

बाभळेश्वर येथे 14 वर्षांपूर्वी भागवत कथा सप्ताह झाला होता, त्यानंतर कोल्हार भगवतीपूरात कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कथेसाठी जमलेला समुदाय पाहून आनंद वाटला. कोल्हार भगवतीपुर हे गाव धार्मिकतेकडे वळत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. कोल्हार भगवतीपुर गाव धार्मिक व्हावे याकरता मी बरेच वर्षे प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला ग्रामस्थांनीच यशस्वी केले. सर्वांनी असे एकजुटीने राहावे असे आवाहन खा. सुजय विखे पाटील यांनी यावेळी केले.

हेही वाचा

माळीणची 9 वर्षं : कुटुंबे आजही अंधारात ! महावितरणने अनेकांचे मीटर नेले काढून

Canada Plain Crash : कॅनडाच्या अलबर्टामध्ये विमान कोसळून ६ जणांचा मृत्यू

जिल्हा न्यायालयात ‘ई-फायलिंग’ सेंटरचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

Back to top button