कोल्‍हापूर : बांबवडे पोलीस दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा ! | पुढारी

कोल्‍हापूर : बांबवडे पोलीस दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा !

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या अंकित बांबवडे येथील पोलीस दूरश्रेत्राचा (चौकी) दरवाजा सताड उघडा असला तरी प्रत्यक्षात कामकाज गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. तालुक्यात सर्वअंगाने प्रमुख आणि संवेदनशील केंद्र असल्याने येथे पोलिस चौकीची गरज अधोरेखित झाली आहे. इतकेच नव्हे तर स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणीही होत आली आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या कारणातून ठाणे प्रमुखांनी दुरक्षेत्रच बंद केल्यामुळे या भागात कायद्याचा धाकच कमी झाला आहे. छोट्या मोठ्या चोरीच्या घटना, अपघात घटना, याबरोबरच परिसरात अवैध व्यवसायाने नव्याने कंबर कसली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी बांबवडे पोलीस दूरक्षेत्र पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याची गरज आहे. नव्हे.., तशी नागरिकांना प्रतीक्षाच लागून राहिली आहे.

शाहूवाडी तालुक्याचा भौगोलिक परीघ मोठा आणि तितकाच क्षेत्रीय अडचणींचा आहे.१०६ गांवे आणि २०० हून अधिक वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना एकाचवेळी न्यायिक सेवा देणे शाहूवाडी पोलिस ठाणे मुख्यालयाला अशक्य होते. यामुळे बांबवडे, मलकापूर, आंबा, तुरुकवाडी, करंजफेण, भेडसगांव अशी बीट कार्यालये अस्तित्वात आली. त्या-त्या परिसरातील तक्रारींचे निवारण वेळेत करणे शक्य झाले. बिट अंमलदार म्हणून एक हवालदार व चार कर्मचारी मिळून कार्यालयाचे दैनंदिन कामकाज चालायचे. साहजिक कायदा सुव्यवस्था सुरळीत राहून अवैध व्यवसायिकांवर पोलिसांचा वचक राहायचा. शिवाय लोकांचा वेळ आणि पैशाची बचत व्हायची. कालौघात हे चित्र पुर्णतः बदलले आणि दुर्दैवाने बांबवडे वगळता सर्वच चौकी कार्यालये निर्जन आणि ओसाड पडली आहेत.

दरम्यान शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या विद्यमान पोलिस निरीक्षकांनी तडकाफडकी बांबवडे पोलीस चौकी बंद करण्याचा फतवा काढून येथील समांतर कामकाज पहाणारे कर्मचारी मुख्यालयाच्या सेवेत परत बोलावून घेतले. अर्थातच अपुऱ्या कर्मचारी संख्येचे कारण पुढे करून एकमेव बांबवडे पोलीस चौकीचे अधिकार क्षेत्र स्वतःच्या आधिकार कक्षेत ठेवले आहे, हा निर्णयच विधी शून्य असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या दुतर्फा वसलेले बांबवडे निमशहर व्यापारी पेठ तसेच मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या परिसरात तितक्याच वेगवान घडामोडी घडत असतात. येथे शाहूवाडी, शिराळा, पन्हाळा तालुक्यातील लोकांचा दररोजचा राबता असतो. महामार्गावर धावणारी प्रवासी वाहने तसेच नागरिकांची वर्दळ यातून प्रासंगिक अनेक अनुचित घटना घडतात. या घटनांवर मध्यवर्ती चौकातील पोलीस दुरक्षेत्रातून नियंत्रण ठेवले जात होते. ते आता अशक्य झाले आहे. दुरक्षेत्राचा दरवजा उघडा असला तरी प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांअभावी त्याला अवकळा आल्याचे वास्तव आहे.

तर छोट्या मोठ्या चोरीच्या घटना, चेन स्नॅचर, गुरूवारच्या आठवडी बाजारातील पाकीटमार, महिलांचे दागिने चोरांचा उच्छाद, अवैध व्यवसायाशी निगडित गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे सद्या मोकाट झाल्याचे चित्र आहे. शिवाय नागरिकांना लहानसहान कामासाठी शाहूवाडीकडे धाव घ्यावी लागतेय, यातून वेळेचा अपव्यय, आर्थिक गैरसोयच होत आहे. या सर्व बाबी विचारात घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

नवा राजा, नवा नियम

शाहूवाडी पोलिस ठाण्यात नव्याने नियुक्त होणाऱ्या प्रत्येक पोलिस निरीक्षकांनी चौक्यांमध्ये कार्यरत दुय्यम अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मर्जीनुसार रदबदली लादल्याची उदाहरणे कायम चर्चेत राहिली. मात्र, आत्तापर्यंत लक्षवेधी राहिलेले बांबवडे सारखे प्रमुख दूरक्षेत्रच बंद ठेवण्याचे धाडस विद्यमान अधिकाऱ्याने दाखविल्यामुळे जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून ‘नवा राजा, नवा कायदा’ अशी उपरोधिक टीकाही होत आहे.

बांबवडे ही मध्यवर्ती बाजारपेठ असून, सर्वच बाबतीत मोठ्या उलाढालीचे केंद्र आहे. येथूनच कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, कराड शहरांकडे वाहतूक होते. वाहन आणि नागरिकांची वर्दळ मोठी असल्याने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस चौकीची नित्तांत गरज आहे. ती पूर्ववत सुरू व्हावी. वाहतूक कोंडी, अवैध व्यवसाय, चोरीच्या घटनांना आळा बसेल, लोकांना होणारा उपद्रव आणि वेळ वाचेल. व्यापारी संघटनेने सीसीटीव्ही यंत्रणा दिलीय. प्रशासनाला आणखी सहकार्याची तयारी आहे.
भगतसिंग चौगले (सरपंच, बांबवडे, ता. शाहूवाडी)

Back to top button