कोल्हापूर : बांबवडे बाजारापेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली; ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यवसायिकांच्या बैठकीत धोरण निश्चित | पुढारी

कोल्हापूर : बांबवडे बाजारापेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली; ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यवसायिकांच्या बैठकीत धोरण निश्चित

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील आर्थिक उलाढालीचे केंद्र असणाऱ्या बांबवडे बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी ही परिसरातील सर्वसामान्य लोकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक ग्रामपंचायतीने मध्यवर्ती बसस्थानक चौकातील रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे मारून लहानमोठ्या वाहनधारकांसह, फेरीवाले, विक्रेत्यांना शिस्त लावण्याबरोबरच प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यासाठी परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी केले आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावर बांबवडे बाजारपेठ वसली आहे. अलीकडच्या काळात आरोग्य तसेच दैनंदिन साधनसामग्री च्या अनुषंगाने या बाजारपेठेने चांगले बस्तान बसविले आहे. साहजिकच घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसह, कोकणात जाणायेणारे पर्यटक, प्रवासी वाहनांची रेलचेल वाढली आहे. यातच फळ, भाजी विक्रेते आणि किराणा माल, फळ, भाजी, औषधं खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांची भर पडत असल्याने पार्किंगचा बोजवारा उडून तासागणिक वाहतूक कोंडी उदभवते. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा उपद्रव सहन करावा लागतो. यातून बाजारपेठेला नकारात्मक प्रतिक्रिया आणि टिकेचा दैनंदिन सामना करावा लागत आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने सरळसरळ दुर्लक्षित केलेली वाहतूक कोंडीची ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनावरचा दबाव वाढणे स्वाभाविक आहे. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि लहानमोठ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत उपाययोजनांचा उहापोह करून बेशिस्त वाहनधारक, आणि पार्किंगला शिस्त लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये रस्त्याकडेला पांढऱ्या पट्ट्यांच्या आत दुचाकीचे पार्किंग करणे, तसेच आठवडा बाजाराच्या ठिकाणी चार चाकी व मोठ्या वाहनांचे पार्किंग करणे, तसेच फळ-भाजी विक्रेत्यांना नियंत्रण रेषेच्या आत व्यवसाय करणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर एसटी वाहतूक नियंत्रकांना देखील विना अडथळा बस थांब्याबाबत विशिष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाचे नियम व बंधने झुगारून बाजारपेठ वेठीस धरणाऱ्या घटकांवर दंडात्मक तसेच वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचे धोरणही बैठकीत निश्चित करण्यात आले.

यावेळी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, सुरेश नारकर, अमर निकम, दिलीप बंडगर, उमेश चव्हाण, प्रकाश निकम, महादेव कांबळे, शामराव कांबळे, मुकुंद प्रभावळे, ग्रामपंचायत सदस्य, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button