गोकुळचे अध्यक्ष पाटील यांचा उद्या राजीनामा | पुढारी

गोकुळचे अध्यक्ष पाटील यांचा उद्या राजीनामा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील बुधवारी (दि. 17) अध्यक्षपदाचा राजीनामा गोकुळचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश गोडबोले यांच्याकडे सुपूर्द करतील. त्यानंतर संचालक बैठकीत हा राजीनामा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
गोकुळमधील सत्तातंरानंतर गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी चुरस होती. परंतु ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर पाटील यांना दोन वर्षांसाठी प्रथम संधी देण्यात आली.

दोन वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी संचालकांची बैठक घेऊन पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितले. याच बैठकीत अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. ठरल्याप्रमाणे पाटील बुधवारी कार्यकारी संचालक गोडबोले यांच्याकडे राजीनामा देतील. संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल.

विश्वास पाटील सन 1986 पासून गोकुळचे संचालक म्हणून सतत निवडून येत आहेत. आतापर्यंत त्यांना तीन वेळा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. दि. 6 डिसेंबर 2004 रोजी प्रथम ते अध्यक्ष झाले. यावेळी दोन वर्षे त्यांना संधी मिळाली. त्यानंतर दि. 7 मे 2015 ते दि. 14 जानेवारी 2019 या कालावधीत दुसर्‍यांदा अध्यक्ष झाले. सत्तांतरानंतर दि. 14 मे 2021 रोजी दोन वर्षासाठी तिसर्‍यांदा अध्यक्ष होण्याचा पाटील यांना मान मिळाला.

Back to top button