Kolhapur Politics | कुठे कंडका पाडला? जनतेला वेठीस धरू नका; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणा | पुढारी

Kolhapur Politics | कुठे कंडका पाडला? जनतेला वेठीस धरू नका; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने विकासात्मक बाबी मांडल्या. तर विरोधकांनी टीकात्मक बाबी मांडल्या. परंतु, सभासद शेतकऱ्यांनी विकासाला कौल दिला. त्यामुळे कंडका पाडणार अशी घोषवाक्ये करून कोल्हापूरच्या जनतेला विरोधकाने वेठीस धरू नये, असा निशाणा खासदार धनंजय महाडिक यांनी नाव न घेता माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर साधला. राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक यांची आज (दि. ९) एकमताने निवड झाली. त्यानंतर महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Kolhapur Politics)

धनंजय महाडिक म्हणाले की, निवडणुकीत अपप्रचार आणि वैयक्तिक चारित्र्यहनन विरोधकांनी केले. त्यास मतदारांनी मतदानातून उत्तर दिले. विरोधकांनी अमल महाडिक यांना २६ प्रश्न विचारले होते. महाडिक यांनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. परंतु अमल महाडिक यांनी विरोधकांना विचारलेल्या ५ प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. ती त्यांनी द्यावीत. अमल महाडिक यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळतील, सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असा विश्वास महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.

कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सभासदांना अपेक्षित होते. परंतु विरोधकांनी ही निवडणूक सभासदावर लादली. त्यामुळे ही निवडणूक जिल्हाभर गाजली. मागील २८ वर्षे माजी आमदार महादेव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सभासदांच्या हिताचा कारभार केला. त्यास मतदारांनी कौल दिला.

दरम्यान, कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधकांनी अपप्रचार केला. त्या प्रचाराला कारखान्याच्या सभासद मतदारांनी मतपेटीतून उत्तर दिले आहे. माझी चेअरमनपदी निवड झाली असली, तरी निवडून आलेले २० सभासद असे सर्वजण आम्ही चेअरमन म्हणून काम करणार आहोत. निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही कारखान्याचे नूतन चेअरमन व माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली.

दरम्यान, राजाराम कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आमदार अमल महाडिक यांची तर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी नारायण बाळकृष्ण चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन संचालकांच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे होते. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा 

कोल्हापूर : राजाराम कारखाना चेअरमनपदी अमल महाडिक, व्हा. चेअरमनपदी नारायण चव्हाण

कोल्हापूर : कायदा सुव्यवस्थेसाठी कुरुंदवाड शहरासह ग्रामीण भागातून पोलिसांचा रूट मार्च

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेला मिळेना ‘ग्रीन सिग्नल’!

Back to top button