कोल्हापूर : पहिली ते चौथी शाळा सुरू होणार दिवाळीनंतर! | पुढारी

कोल्हापूर : पहिली ते चौथी शाळा सुरू होणार दिवाळीनंतर!

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : तब्बल 18 महिन्यांचा कालावधी उलटल्यावर दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात शासनस्तरावरून अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

ऑनलाईन शिक्षणामुळे शालेय विद्यार्थी शाळेपासून दीड वर्षापासून दूर आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पाया ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 4 ऑक्टोबरला पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत.

दुसरीकडे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. याबाबत पालकांकडून विचारणा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधत पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याच्या द़ृष्टीने नियोजन केले जात आहे. शहरी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरून त्यासंबंधीचा अंतिम निर्णय होईल.
– दिनकर टेमकर,संचालक, प्राथमिक शिक्षण, पुणे

Back to top button