Rajarshi Shahu Maharaj | ‘लोकराजा’ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन; १०० सेकंद कोल्हापूर झाले स्तब्ध! | पुढारी

Rajarshi Shahu Maharaj | 'लोकराजा' राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन; १०० सेकंद कोल्हापूर झाले स्तब्ध!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज (दि.६) कोल्हापुरात अभिवादन करण्यात आले. कोल्हापुरीतील तमाम जनता सकाळी १० वाजता १०० सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहिली आणि लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली. (Rajarshi Shahu Maharaj )

गेल्या वर्षी (२०२२) शाहू महाराज यांच स्मृती शताब्दी वर्ष होते. या वर्षी शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा प्रशासनाने आज दि. ६ ते दि. १४ मे या कालावधीत कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे राजर्षींच्या विचारांचा जागर सुरू आहे.

Rajarshi Shahu Maharaj : शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध

आज ( दि. ६ मे, शनिवार) सकाळी दहा वाजता शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाले. जिथे असेल त्या जागेवर शंभर सेकंद स्तब्धता पाळून राजर्षींना मानवंदना दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील नऊ सिग्‍नल या कालावधीत ‘रेड’ झाले. एस.टी. बसेस तसेच अन्य वाहने, जाग्यावर थांबवली गेली. विविध कार्यालयांतील कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी आदी सर्वच नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

आज शाहू मिलमध्ये ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपट

आज शाहू मिलमध्ये कृतज्ञता पर्वाचे सकाळी उद्घाटन होणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता १९५२ सालचा ‘छत्रपती शिवाजी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता लोककला व स्थानिक पारंपरिक कलाकार हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत अंबा महोत्सवासह कापड, गूळ, चप्पल, मिरची, तांदूळ आदी महोत्सवात सहभागी होता येणार आहे.

हेही वाचा 

Back to top button