अहमदनगर झेडपी शाळांचा निकाल पाच दिवस पुढे! छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी होणार निकाल वाटप | पुढारी

अहमदनगर झेडपी शाळांचा निकाल पाच दिवस पुढे! छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी होणार निकाल वाटप

नगर, पुढारी वृत्तसेवा: दर वर्षी एक मे रोजी म्हणजे महाराष्ट्रदिनी जिल्हा परिषदेच्या (झेडपी) शाळांचा निकाल जाहीर करण्यात येतो. या वर्षीही सर्व शाळांमध्ये गुरुजींनी निकालपत्रक तयार करून ठेवले आहे. विद्यार्थी-पालकांनाही निकालाची ओढ लागलेली आहे. मात्र हा निकाल आता पाच दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाऐवजी या वर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी अर्थात 6 मे रोजी हा निकाल देण्याचे शासनाने सूचित केले आहे.

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी सन 2023ची उन्हाळ्याची सुटी व आगामी शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत. याशिवाय निकालासंदर्भातही पत्र काढले आहे.

1 मे रोजी महाराष्ट्र दिन असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता 6 मे रोजी होत आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर 6 मे रोजी शाळांचा निकाल जाहीर करावा व गुणपत्रकांचे वाटप करावे. निकालासोबत विविध उपक्रमांचे आयोजन करून शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा करावा, अशा सूचना शिक्षण संचालक शरद गोसावी काढल्या आहेत.

दरम्यान, या पत्रानुसार आज एक मे रोजी मुलांना निकाल दिला जाणार नाही. महाराष्ट्र दिन साजरा करून मुलांना सहा मे रोजी निकालासाठी बोलावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button