शाहूंचे आठवावे कर्तृत्व | पुढारी

शाहूंचे आठवावे कर्तृत्व

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त लोकराजाचे कर्तृत्व आठवताना कुणाही शाहूप्रेमीच्या मनात प्रश्नांचे काहूर उठल्याशिवाय राहत नाही. इंदू मिलमध्ये जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे, त्याच पद्धतीने शाहू मिलमध्ये शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने घेतला होता. त्या गोष्टीला दहा वर्षे उलटून गेली. मधल्या काळात अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु, शाहू महाराजांच्या स्मारकाची काहीही प्रगती होऊ शकली नाही.

डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी बाबासाहेबांचे अनुयायी जसा रेटा निर्माण करतात तसा रेटा शाहूप्रेमींकडून निर्माण होत नाही, ही वस्तुस्थिती असली, तरी महापुरुषांची स्मारके उभारण्याची घोषणा केल्यानंतर त्यासंदर्भात गतीने पावले टाकण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या द़ृष्टिकोनातून पाहिले, तर सरकारने शाहू स्मारकाची उपेक्षा केली, असे म्हणावे लागेल. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे राजे असले, तरी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीला दिशा देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शाहू महाराज किती काळाच्या पुढे पाहणारे होते, हे त्यांच्या एकेका निर्णयामधून दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला आदर्श मानून आणि त्यांच्या कारभारापासून प्रेरणा घेऊन राज्यकारभार करणार्‍या शाहू महाराजांनी शिवरायांचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे नेला.

ब्रिटिशांची राजवट होती, संस्थानात बहुतांश अशिक्षित आणि रुढी परंपरांच्या ओझ्याखाली वाकलेला समाज होता, जो शिकलेला मूठभर समाज होता तो आपले वर्चस्व टिकवण्यासाठी कारस्थानांवर कारस्थाने रचण्यात मश्गूल होता. अशा परिस्थितीत शाहू महाराजांना राज्यकारभार करावा लागला, अनेक संकटांचा सामना करीत संस्थानचा कारभार करीत असताना सामान्य माणसाचे हित त्यांनी कधी नजरेआड होऊ दिले नाही. अवघ्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी उभे केलेले अतुलनीय काम महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील राज्यकर्त्यांना दिशादर्शक आहे. सत्ता केवळ उपभोगण्यात मश्गूल असलेल्या राजे-रजवाड्यांची मोठी परंपरा असताना त्यांनी वेगळी वाट निवडली. सत्ता कशी आणि कुणासाठी राबवायची असते, याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या कामातून घालून दिला. तळागाळातला सामान्य माणूस सत्तेचा केंद्रबिंदू मानून राज्यकारभार केला. त्याचमुळे शंभर वर्षांनीही शाहू महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व अनुकरणीय ठरते.

माणसाच्या जगण्याचे असे एकही क्षेत्र आढळत नाही, जिथे शाहू महाराजांचा परिसस्पर्श झाला नाही. राजवाड्याच्या ऐषोआरामात शाहू महाराज कधी रमले नाहीत. त्याऐवजी खेडोपाडी, रानावनात गरिबांच्या, कष्टकर्‍यांच्या झोपडीमध्ये

कांदा-भाकर खात त्यांची सुख-दुःखे जाणून घेण्याला त्यांनी प्राधान्य दिले. राधानगरी धरण उभारून हरितक्रांतीला चालना दिली. स्मार्ट सिटीची संकल्पना गेल्या दशकभरातील म्हणून ओळखली जाते. परंतु, जयसिंगपूरसारखे शहर वसवून सव्वाशे वर्षांपूर्वी महाराजांनी स्मार्ट सिटीची संकल्पना अस्तित्वात आणली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी जो विचार मांडला, तो आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून कृतीत आणला. माणगाव परिषदेच्या माध्यमातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे यापुढे दलित समाजाचे नेते असतील,’ अशी घोषणा केली.

बाबासाहेबांना ‘मूकनायक’ वृत्तपत्र सुरू करण्यासाठी, तसेच परदेशी शिक्षणासाठी मदत करून जबाबदार राज्यकर्त्याची भूमिका पार पाडली. प्राथमिक शिक्षणाची होणारी हेळसांड आणि शाळाबाह्य मुलांचा विषय आजही अनेकदा चर्चेत येत असतो. या पार्श्वभूमीवर शंभर वर्षांपूर्वी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करून संस्थानातल्या शेतकरी, कष्टकर्‍यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार्‍या शाहू महाराजांच्या दूरद़ृष्टीची कल्पना येऊ शकते. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची फक्त घोषणा करून नामानिराळे न राहता त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठीही ते प्रयत्नशील राहिले. तत्कालीन समाजव्यवस्थेतील अस्पृश्यांच्या मुलांसाठी असलेल्या वेगळ्या शाळा बंद करून त्यांनी दलित मुलांना सर्वसामान्य शाळेत बसायला परवानगी दिली, त्यायोगे अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

गंगाराम कांबळे यांना कोल्हापुरात हॉटेल काढून देऊन त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा प्यायला जाऊन त्याद्वारेही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कृतिशील प्रयत्न केले. जातवार वसतिगृहे काढून शिक्षणाची प्रक्रिया गतिमान करण्याचा त्यांचा प्रयत्न जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय असा म्हणावा लागेल. एकीकडे जातीनिर्मूलनाचे काम करीत असताना जातवार वसतिगृहे कशासाठी, असा प्रश्न आजही काही लोक विचारतात. त्यांना सांगावे लागते की, शाहू महाराज पुरोगामी असले, तरी खेड्यापाड्यातली रयत तेवढी विचारी नव्हती. आपल्या मुलांनी परक्या जातीच्या मुलांसोबत राहणे त्यांना मान्य झाले नसते आणि त्यामुळे संबंधित मुलांचे शिक्षण थांबले असते. या पालकांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांनी जातवार वसतिगृहे काढली. त्याचमुळे कोल्हापूर नगरीला ‘मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस’ म्हणून गौरवले जाते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांनी केलेले काम दुर्लक्षित असले, तरी अत्यंत महत्त्वाचे आहे.

दुष्काळाच्या काळात त्यांनी राबवलेल्या योजना जशाच्या तशा घेऊन पंचाहत्तर वर्षांनी महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना तयार केली. तीच योजना पुढे देशपातळीवर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) म्हणून स्वीकारली गेली. त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले, त्याच परंपरेतून पुढे देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्यासारखे मल्ल तयार झाले. अल्लादिया खाँसाहेब यांच्यासारख्या गायकाला कोल्हापुरात आणून गायन परंपरा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन समाजाला अचंबित करणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले, त्यामध्ये राज्यकर्त्याचा कणखरपणा होताच. शिवाय, करुणेचाही उत्तुंग आविष्कार होता. सरकारने स्मृती शताब्दी वर्ष वाया घालवले असले, तरीसुद्धा पुढील वर्ष हे राजर्षी शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे, या वर्षात तरी शाहू स्मारकाचे काम मार्गी लावावे ही अपेक्षा गैर ठरत नाही.

Back to top button