कोल्हापूर : वडणगे येथे पाण्यातून विषबाधा होऊन ३५ शेळ्यांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : वडणगे येथे पाण्यातून विषबाधा होऊन ३५ शेळ्यांचा मृत्यू

वडणगे, पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता. करवीर ) येथे रासायनिक लागवड टाकून तयार करून ठेवलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन येथील सागर लांडगे व भागोजी अष्टेकर यांच्या ३५ शेळ्यांचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघा मेंढपाळांचे सुमारे सहा लाखांवर नुकसान झाले. येथील मेंढपाळ आज दिवसभर शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी चार वाजता ते शेळ्यांना घेऊन साखळकर मळ्यात गेले. आज शेती पंपाचे दिवसा भारनियमन असल्याने पंप बंद होते.

कुठेही पाणी नसल्याने तहानलेल्या शेळ्या साखरकर मळ्यातील एका शेतात पाण्याने भरून ठेवलेल्या एका बॅरेल मधील पाणी पिण्यासाठी गेल्या.पाणी पिल्यानंतर काही वेळात सर्व शेळ्या तडफडू लागल्या. त्यानंतर मेंढपाळांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्या बॅरेलमध्ये लागवड मिश्रित पाणी असल्याचे समजले. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलण्यात आले. या अधिकाऱ्यांनी शेळ्यांवर प्राथमिक उपचार केले. मात्र, ३५ शेळ्यांचा लागवड मिश्रित पाणी पिल्याने शेळ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघाही मेंढपाळांचं मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना आर्थिक मदत करावी असे आवाहन मेंढपाळ समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button