कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. अध्यक्षपद राहुल पाटील यांना मिळावे, यासाठी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आ. पी. एन. पाटील यांचा आग्रह कायम असून, शनिवारी सायंकाळी त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी शासकीय विश्रामधाम येथे बंद खोलीत चर्चा केली. सुमारे पाऊण तास ही चर्चा सुरू होती. मात्र, अध्यक्षपदाबाबत निर्णय होऊ शकला नाही. रविवारी (दि.11) यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदावरून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जोरात ताणाताणी सुरू आहे. पदाधिकार्यांचे राजीनामे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितला. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ सदस्य संख्या पाहता अध्यक्षपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी आ. पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी पदाधिकार्यांनी राजीनामे देखील दिलेले नव्हते.
अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे यासाठी मंत्री मुश्रीफ सुरुवातीपासून ठाम आहेत. आ. पी. एन. पाटील यांनीही चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी आग्रह धरला आहे. शनिवारी सायंकाळी पालकमंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ व आ. पी. एन. पाटील यांच्यात शासकीय विश्रामधाम येथे अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. सुमारे पाऊणतास ही चर्चा सुरू होती.
या बैठकीसाठी पालकमंत्री पाटील खासगी वाहनातून एकटेच आले होते. अध्यक्षपदाचा फॉर्म्युला यापूर्वी निश्चित केला असल्याचे यावेळी सांगण्यात आल्याचे समजते. परंतु; यावर निर्णय होऊ शकला नाही.
पन्हाळा : पन्हाळगडावर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी सदस्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी येथील एका हॉटेलमध्ये सदस्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे.
पन्हाळ्यातील सर्व व्यवहार गेली दोन वर्षे ठप्प आहेत. असे असताना जिल्हा परिषद सदस्य कसे काय येथे राहायला येऊ शकतात? त्यांच्या वावरण्याने कोरोना पसरत नाही का? असा नागरिकांतून प्रश्न विचारला जात आहे.
रविवारी पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ पन्हाळगडावर आल्यानंतर त्यांना येथील सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्याची तयारी व्यापारी, व्यावसायिकांनी सुरू केल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख मारुती माने यांनी दिली.
हे ही वाचा :