एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेताना कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यावी? | पुढारी

एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेताना कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यावी?

सतीश जाधव

भारतीय जीवन विम्याची पॉलिसी हे केवळ आपले भविष्य सुरक्षित करत नाही, तर कर्ज घेण्यासाठीदेखील उपयुक्‍त ठरत आहे. आपत्कालीन काळात बँक किंवा एलआयसी या दोन्हींपैकी कोठूनही आपण पॉलिसीच्या बदल्यात कर्ज घेऊ शकतो. त्याचवेळी दुसरीकडे एलआयसीकडून कर्ज घेतल्यावर आणखी एक फायदा मिळतो, तो म्हणजे आपल्याला केवळ व्याज भरावे लागते आणि पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यास मूळ रकमेतून पैसे वजा केले जातात.

एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेताना कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते, ते पाहू या.

90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते

एलआयसीशिवाय सर्वच सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या पॉलिसीच्या आधारे कर्ज देतात. अर्थात पॉलिसीवर मिळणारे कर्ज हे आपल्या सरेंडर व्हॅल्यूवर अवलंबून असते. म्हणजेच कर्ज घेते वेळी विमाधारकाने सदर पॉलिसीसाठी किती रक्‍कम भरली आहे, त्याच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते. उदाहरणार्थ, एक लाखाची विमा पॉलिसी असेल आणि पॉलिसीधारकाने 40 हजार रुपये भरले असतील, तर त्याला 36 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

कोणत्या पॉलिसीवर कर्ज?

अर्थात, सर्व विमा पॉलिसीवर कर्ज मिळत नाही. जीवन विमातंर्गत अँडोमेंट प्लॅनवरच कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या पॉलिसीवर बँकादेखील कर्ज देण्यास तयार होतात.

कर्जाची परतफेड कशी?

जर आपल्याला एलआयसीचे कर्ज हवे असेल तर त्याचा एक फायदा असा की, कर्जाची परतफेड करण्यासाठी पर्याय दिले जातात. यानुसार पॉलिसीच्या कालावधीपर्यंत व्याजाची रक्‍कम भरावी लागते आणि पॉलिसीची मुदत संपल्यानंतर मूळ रकमेची त्यातून कपात केली जाते.

कागदपत्रांची गरज

विमा पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला विमा कंपनीला कर्जासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर पॉलिसीची मूळ प्रत जमा करावी लागते आणि पॉलिसीपासून मिळणारे लाभ हे बँक किंवा कंपनीत जमा होत राहतील. यासाठी पॉलिसीधारकाला स्वाक्षर्‍या कराव्या लागतील. जोपर्यंत कर्जाची फेड होत नाही तोपर्यंत पॉलिसीचे कागदपत्रे बँक किंवा विमाकंपनीकडे अनामत म्हणून राहतात. बँकेला पॉलिसीच्या भरलेल्या हप्त्याची पावती देखील द्यावी लागते. विम्यावर कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक कॅन्सल चेकदेखील द्यावा लागतो.

व्याजाचे प्रमाण

जीवन विमा पॉलिसीवर दिल्या जाणार्‍या कर्जाचा व्याजदर हे पॉलिसीचे भरलेले हप्‍ते आणि हप्त्यांच्या संख्येवर अवलंबून असतो. अर्थात पर्सनल लोनवर आकारल्या जाणार्‍या व्याजदराच्या तुलनेत या व्याजदराचे प्रमाण कमी असते. बँकात यासाठी वेगवेगळे नियम असतात. जीवन विम्यावरील व्याजदर साधारणतः 9.5 टक्के आहे. त्याचवेळी बँकांकडून कर्ज घेतल्यास आपल्याला दहा ते चौदा टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागते. व्याजदर हे आपल्या पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असते.

जीवन विम्यावर दिल्या जाणार्‍या कर्जाची परतफेड ही हप्त्याच्या रूपातून केली जाते. ही बाब कंपनी किंवा बँकेच्या धोरणानुसार ठरलेली असते. त्याचा किमान कालावधी हा सहा महिन्यांचा असतो. अनेक कंपन्या आणि बँका या पॉलिसीच्या कालावधीनुसार कर्ज देण्यास ऑफर करत असतात.

Back to top button