श्री अंबाबाईच्या सुरक्षिततेतील रणरागिणी! | पुढारी

श्री अंबाबाईच्या सुरक्षिततेतील रणरागिणी!

कोल्हापूर : गौरव डोंगरे

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाते उद्धारी… ऐसी वर्णिली मातेची थोरवी। शेकडो गुरूनिहि॥’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही सर्व क्षेत्रांत भरारी घेत आहेत. नवरात्रौत्सव नारीशक्तीचा जागर समजला जातो. यामध्येही त्या हिरिरीने सहभागी झाल्या आहेत. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारीही महिला पार पाडताना दिसत आहेत.

आठ महिला अधिकारी, 40 महिला पोलिस व 45 महिला होमगार्ड असा बंदोबस्त अंबाबाई मंदिर परिसरात आहे. भाविकांची तपासणी, रांग व्यवस्थापन, गर्दीवर नियंत्रण, वाहतुकीचे नियोजन यासह शहरातील सर्वच महत्त्वाच्या चौकांत महिला पोलिस तैनात आहेत.

महत्त्वाच्या पदांवर उत्तम कामगिरी

जिल्हा पोलिस दलातील महत्त्वाचे असणारे अप्पर पोलिस अधीक्षकपद जयश्री गायकवाड सांभाळत आहेत. तसेच जिल्हा गृहरक्षक विभागाची (होमगार्ड) अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. गृह उपअधीक्षक म्हणून नुकत्याच हजर झालेल्या प्रिया पाटीलही महत्त्वाचे पद भूषवत आहेत. शहराची वाहतूक कोंडी फोडण्याचे आणि शिस्तबद्ध वाहतुकीची जबाबदारी पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या खांद्यावर आहे.

आठ तासांची ड्युटी केव्हा?

मुलगी, पत्नी, आई, सून अशा जबाबदार्‍यांना न्याय देत 12 तास ड्युटी महिला पोलिस बजावतात. राज्य शासनाने महिला पोलिसांची ड्युटी 8 तासांवर आणण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी करून महिला पोलिसांना नवरात्रीचे गिफ्ट देता येईल.

Back to top button