पत्नीचे अनैतिक संबध असल्याच्या संशयाने वारणा कापशीतील चिमुरड्याचा बळी | पुढारी

पत्नीचे अनैतिक संबध असल्याच्या संशयाने वारणा कापशीतील चिमुरड्याचा बळी

कोल्हापूर , पुढारी ऑनलाईन

पत्नीचे परपरुषाशी अनैतिक सबंध असल्याचे खूळ डोकीत बसले आणि आपला मुलगा हा आपला नसून अनैतिक संबंधातून जन्माला आलाय, या चिडीतून शाहूवाडीतील कापशीतील चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडली आहे. (अनैतिक संबध बळी)

शाहूवाडी तालुक्यातील कापशीमध्ये राकेश केसरे याला दोन मुले, त्यापैकी दुसरा आरव हा पाच वर्षांचा होता. राकेश आणि त्याच्या पत्नीचे वारंवार भांडण होत होते. पत्नीचे अनैतिक संबध असल्याची कुणकूण त्याला लागली होती. पत्नीचे अनैतिक संबध रंगेहाथ पकडले होते, असे त्याने पोलिसांना सांगितले.

आरवाचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या पार्थिवावर हळद कुंकू टाकले होते. त्यामुळे तो नरबळीचा प्रकार आहे का? अशी अफवाही उठली होती. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करून या प्रकरणाचा छडा लावत राकेशला अटक केली. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते. तपासासाठी तब्बल आठ पथके तैनात केली.

प्रथम मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली. त्यामुळे आसपासचा परिसर पिंजून काढला. विहिरींमध्ये गळ टाकून तळ शोधला. श्वान पथकही आणले मात्र, काहीच शोध लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी गावात महिला आणि अन्य नागरिकांकडे चौकशी सुरू केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. त्याआधारेच पोलिस राकेशपर्यंत पोहोचू शकले. महिलांकडे चौकशी केल्यानंतर पती आणि पत्नीत वाद असल्याचे समोर आले. त्यानुसार राकेशला ताब्यात घेत पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू केला.

त्यात राकेश याने खुनाची कबुली दिली. ३ ऑक्टोबर रोजी राकेश याचा एक नातेवाईक जेवणासाठी घरी येऊन गेला होता. त्याचा राग राकेशच्या डोक्यात होता (अनैतिक संबध बळी) . त्याचवेळी आरव समोर आला. राकेशची पत्नी गल्लीतील एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. राकेशने आरवला तिला बोलावून आण असे सांगितले. मात्र, तो गेला नाही. त्याचा राग आल्याने आरवच्या छातीवर जोराचा ठोसा लगावला. त्यानंतर तो बेशुद्ध पडल्याने त्याचा गळा दाबून ठार मारले. त्यानंतर त्याला अडगळीच्या खोलीत कडब्याच्या पेंडीखाली लपवले.

मुलगा हरवला आहे, असा बहाना करून त्याने शाहूवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गावात तळ ठोकून तपास करत राकेशला अटक केले.

प्रथम नरबळी वाटणारे हे प्रकरण घरगुती वादातून झाल्याचे पोलिसांना लक्षात आले. राकेशची पत्नी, तिची अविवाहित बहीण आणि आजी या तिघीही याबाबत माहिती देत नव्हत्या. मात्र, पोलिसांनी शिताफीने नागरिकांना बोलते करून खूनामागचे कारण शोधून काढले.

अनैतिक संबध बळी : गावातूनच खरेदी केले नारळ, लिंबू, गुलाल

आरवचा खून केल्यानंतर राकेश याने गावातील दुकानातून नारळ, लिंबू, गुलाल, कुंकू असे साहित्य खरेदी केले. त्यानंतर नागरिकांबरोबर शोध घेत असताना त्याने तो नारळ महादेव मंदिरासमोर ठेवला. हे प्रकरण नरबळीचे असल्याचे दाखवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: 

Back to top button