कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने तारांबळ | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने तारांबळ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी पोलीस मुख्यालयात आल्याने सुरक्षा यंत्रणासह भाविकांची तारांबळ उडाली.

तपासणीअंती काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. निनावी दूरध्वनीमुळे नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलीस यंत्रणेची मात्र तारांबळ उडाली.

विशेष पथकासह श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अंबाबाई मंदिरात धाव घेतली. या प्रकारामुळे दीड तास हजारो भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागले. पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला पोलीस मुख्यालयात निनावी दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला आहे.

या घटनेची वरिष्ठ स्तरावर दखल घेत पोलिसांची पथके ताबडतोब मंदिराकडे रवाना करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे हे देखील मंदिरात दाखल झाले.
यावेळी दर्शनासाठी मंदिराचा सारा परिसर भाविकांनी फुलला होता.

पोलिसांनी ताबडतोब दर्शन रांगा बंद करून भाविकांना सुरक्षितस्थळी हलवले. तसेच मंदिरातील भाविकांची गर्दी कमी करून पोलिसांनी मंदिर परिसर ताब्यात घेतला एका तासाहून अधिक काळ शोध मोहीम सुरू होती. तपासणीअंती काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. निनावी दूरध्वनीमुळे नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली.

हे ही वाचलं का?

 

Back to top button