इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने निर्दयी पित्याने मुलाला नदीत फेकले. कबनुर (तालुका हातकणंगले) येथील निर्दयी पित्याने हे कृत्य केले. त्याने आपल्या पाच वर्षीय मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापाने या कृत्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे. पित्याने मुलाला नदीत फेकले या वार्तेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अफांन सिकंदर मुल्ला( वय 5 रा पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे त्या मुलाचे नाव आहे, तर पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) यास शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
कबनूर येथे राहणारा सिकंदर मुल्ला मिळेल ते मजुरीचे काम करतो. तो दिव्यांग आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे.
त्यातच दारूच्या नशेत तो अनेकवेळा घराबाहेरच असतो. त्याला दहा वर्षाची मुलगी व अफान अशी दोन मुले आहेत.
अफान याला फिट्सचा आजार आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाचे कारणावरून ही त्यांच्या सतत वाद होत असतात.
सिकंदर हा दोन दिवस घराबाहेर होता. घरी परतल्यानंतर त्याच्या पत्नीचे व नातेवाईकांनी त्याला चांगलेच सुनावले. मुलाचा औषधोपचाराचा खर्च तरी बघ असे सांगितले. या कारणावरून सिकंदर चिडून होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी जावूया असे सांगून तो सायकलवरून अफानला घेऊन घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिल्याचे नातेवाईकांना सांगितले. काही वेळा नातेवाईक व नागरिकांनाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, मात्र त्याला शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने अफान याला पंचगंगा नदी वरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत अफान याचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. आज सकाळपासून पुन्हा त्याचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. तपासबाबत सूचना केल्या. मुलाला नदीत फेकल्याची गेल्या दोन महिन्यांतील परिसरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.