औरंगाबाद : पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्याचा मृत्यू

सोयगाव; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने कर्ज काढून लावलेल्या दोन एकर कपाशीसह शेत वाहून गेले. हा धक्का सहन न होऊन अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. निंबायती (ता. सोयगाव) येथे बुधवारी (दि. २९) ही घटना घडली. या शेतकऱ्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोयगाव तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात सोमवारी रात्री व मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने खरिपाचे पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. निंबायती येथील शेतकरी डिगांबर रामचंद्र राठोड (वय ४९) यांचे रामपुरा शिवारात शेत आहे. त्यांनी गट क्रमांक-४९ मध्ये कर्ज काढून कपाशीची लागवड केली होती.

अतिवृष्टीने त्यांचे दोन एकर क्षेत्र कपाशीसह वाहून गेले. बुधवारी पावसाने उसंत घेतल्याने राठोड हे पहाटे शेतात गेले. शेतातील भीषण नुकसान पाहून ते सैरभैर झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने ते आल्या पावली मागे फिरले. घरी आल्यानंतर त्यांनी पीक हातचे गेल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर त्यांना घाम आला व प्रकृती अत्यस्वस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे सोयगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

कसानीच्या धक्क्याचा पहिला बळी

राठोड यांच्या मुलीचा महिनाभरानंतर विवाह होता. मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या खर्चाची त्यांना विवंचना होती. त्यात खरीप हातचे गेले. पिकासाठी घेतलेले कर्ज फेडणेही शक्य नसल्याने ते तणावात गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

नुकसानीचा व्हिडिओ व्हायरल

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या शेताचा व्हिडिओ मयत शेतकऱ्याच्या मुलाने मंगळवारीच प्रशासनासमोर व्हायरल केला होता. शेती वाहून गेल्यावरही मदत मिळणार नसल्याचा त्यांच्या मनातील ग्रह पक्का झाला. त्यामुळे त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

हेही वाचलत का?

Back to top button