जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मध्ये कोर्टाजवळ लावलेली मोपेड मोटरसायकल बनावट चावीने दिवसभर वापरून ती पुन्हा सांयकाळी कोर्टाजवळ आणून लावण्याचा प्रकार चार दिवस सुरू होता. या प्रकारानंतर पाचव्या दिवशी चोरट्यांना ही मोटरसायकल चोरण्याचा मोह आवरला नाही. आणि अखेर मंगळवारी (दि.14) रोजी मोपेड मोटरसायकलची चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर संशयीत मोटरसायकल चोरटा तुषार रावसो तेरदाळे याच्यासह अन्य तीन चोरट्यांकडून मोपेडसह 7 मोटरसायकली असा एकूण 2 लाख 22 हजार रूपयांचा मुद्देमाल जयसिंगपूर पोलिसांनी हस्तगत केला.
याप्रश्नी तुषार रावसो तेरदाळे (वय 23, रा. मंगेश्वरनगर कोथळी, ता.शिरोळ), प्रताप संजय माने (वय 27), ऋतीक नितीन इंगवले (वय 19) व वकील संजय वाळकुंजे (वय 21, सर्व रा. दानोळी, ता.शिरोळ) यांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेवून येथील प्रथमवर्ग न्यालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयसिंगपूर परिसरात सातत्याने मोटरसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस नाईक सागर सुर्यवंशी, अंजना बन्ने, पो.कॉ. संजय शेटे, अमोल अवघडे, रोहित डावाळे, शशिकांत भोसले, वैभव सुर्यवंशी यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी मोटरसायकल चोरट्यांवर लक्ष ठेवून होते. अशातच सांगली आगाराचे एसटी चालक हे आपली मोटरसायकल सेशन कार्टाजवळ लावून जात होते. संशयीत चोरटा तुषार तेरदाळे यांनी सदर मोपेट मोटरसायकल बनावट चावीने चार दिवस मोटरसायकल सकाळी नेऊन सायंकाळी परत आणून लावत होता.
अखेर मंगळवारी ही मोटरसायकल चोरी करून घेवून गेले. व या मोटरसायकल चोरीची फिर्याद या चालकाने दिल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत संशयीत तेरदाळे याचा शोध घेतला. त्यानंतर अन्य तिघे चोरटे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर चोरलेल्या पाच व गुन्ह्यात वापरलेल्या दोन अशा एकूण 7 मोटरसायकलींचा 2 लाख 20 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.