कोल्हापूर महापूर : नुकसान ७०० कोटी; मिळणार १०० कोटी - पुढारी

कोल्हापूर महापूर : नुकसान ७०० कोटी; मिळणार १०० कोटी

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : महापूर मुळे जिल्ह्यातील व्यापार्‍यांचे अंदाजे 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले; पण शासन निकषाप्रमाणे मिळणारी नुकसानभरपाई ही जेमतेम शंभर कोटी असणार आहे. पूरग्रस्त भागातील व्यापार्‍यांच्या नुकसानीच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार असून ती अपुरी आहे. त्यामुळे कोणत्याही निकषाशिवाय जेवढे नुकसान झाले तेवढी भरपाई मिळावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.

सन 2019 पेक्षा यंदा पुराची तीव्रता जास्त होती. शासनाने यावेळी ज्या व्यापार्‍यांचे नुकसान झाले त्यांना नुकसानीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील ज्या व्यापार्‍यांंचे पंचनामे झाले, त्यांना नुकसानभरपाई मिळाली; पण वेळेत पंचनामे झाले नाहीत, असे अनेक व्यापारी मदतीपासून वंचित राहिले आहेत.

2019 साली शासनाची मदत व विमा कंपन्यांकडून काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली होती; पण 2019 साली ज्या भागात व गावांत पुराचे सर्वाधिक पाणी आले, त्या भागातील व्यापार्‍यांचा मालाचा विमा उतरवला गेला नाही. त्यामुळे 2021 साली व्यापार्‍यांना पुरामुळे जे नुकसान झाले, त्याची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळणार नाही. याचा व्यापार्‍यांना मोठा फटका बसणार आहे. कारण यावेळी 75 टक्के नुकसानभरपाईची रक्कम किंवा 50 हजार रुपये इतकीच नुकसानभरपाई मिळणार आहे. व्यापार्‍यांचे नुकसान लाखात झाले आहे, तर नुकसानभरपाई हजारात मिळणार आहे.

व्यापार्‍यांचे जेवढे नुकसान, तेवढी भरपाई द्या : शेटे

जिल्ह्यातील 1200 हून अधिक व्यापारी पुरबाधित होते. त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. सलग तीन वर्षे व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निकष न लावता जेवढे नुकसान झाले तेवढी भरपाई ही दिलीच पाहिजे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

Back to top button