कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणार्या दि प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक चौथ्या टप्प्यात होणार आहे. याबरोबर संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या 39 पतसंस्थांच्या निवडणुकाचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांतील राजकारणाने चांगलीच उखळी येत आहे.
बँकेच्या निवडणुकीपूर्वी शिक्षकांच्या पात्र पतसंस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याबरोबर डिसेंबर महिन्यातील काही पतसंस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिक्षक बँकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता असली तरी पतसंस्था व बँक निवडणुकीच्या रणनीतीसाठी शिक्षकांच्या बैठका, चर्चा, आणभागांनी जिल्ह्यातील शिक्षकांचे राजकारण ढवळून निघू लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एक शिक्षक बँक व शिक्षकांच्या 52 पतसंस्था आहेत. यातील सुमारे 39 पतसंस्थांच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या सहा टप्प्यांत या39 पतसंस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पतसंस्था आणि बँक यांच्यातील व्यावसायिक पातळीवर मोठी इर्ष्या आहे; पण बँकेच्या राजकारणासाठी शिक्षकांना पतसंस्थेच्या व्यासपीठाचा निश्चितपणे आधार घ्यावा लागतो. त्यामुळे शिक्षक बँकेवर निवडून जाण्यासाठी मार्ग सोपा ठरतो.
तर काही संचालक हे आपापल्या लौकिकावरही बँकेत निवडून गेले आहेत. त्यालाही तालुक्यातील शिक्षकांतील राजकारणाचा संदर्भ होता. आता शिक्षक बँक आणि या 39 पतसंस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी नेतेमंडळींना अनेकांना विविध आश्वासने देऊन निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ राजाराम वरूटे गट, शिक्षक संघ (थोरात गट), प्रसाद पाटील यांची पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समिती आणि जुनी पेन्शन हक्क संघटना अशा पाच संघटनांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यातून सत्तारूढ गटाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यांमध्ये प्राथमिक बैठका होऊन पतसंस्था आणि शिक्षक बँकेकडे कोण प्रतिनिधी पाठवावयाचा, यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.