‘आक्रोश पदयात्रा’ : प्रयाग चिखलीतून राजू शेट्टी यांच्या पदयात्रेस सुरुवात | पुढारी

'आक्रोश पदयात्रा' : प्रयाग चिखलीतून राजू शेट्टी यांच्या पदयात्रेस सुरुवात

दोनवडे (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : पूरबाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा शासन आदेश बदलून २०१९ प्रमाणे मदत जाहीर करा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसह आजपासून (दि.1) प्रयाग चिखली ते नृहसिंहवाडी अशी पंचगंगा परिक्रमा आक्रोेश पुरग्रस्तांचा पदयात्रा सुरू झाली.

मागण्या मान्य न झाल्यास रविवारी (दि.५) नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत हजारो शेतकर्‍यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी २३ ऑगस्टला राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. मोर्चानंतर ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्‍यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरातून सकाळी आठ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. ५ सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे. यामध्ये हजारे पूरग्रस्त शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

यावेळी आक्रोेश पुरग्रस्तांचा पदयात्रा सुरू होताना सावकार मादनाईक, डॉ. जालंदर पाटील, वैभव कांबळे, अजित पवार, बाळासाहेब पाटील, रंगराव पाटील, राजाराम देसाई, सागर शंभुशेटे, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ राजू शेट्टी, सम्मेद शिखरे, सचिन शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या मागण्या

♦2019 च्या धर्तीवर शेतकर्‍यांना मदत द्या

♦विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा

♦नुकसानग्रस्त प्रत्येक घटकाला तत्काळ आर्थिक मदत द्या

♦पडझड झालेली घरे बांधून द्या

♦पूरबाधित क्षेत्रातील रहिवाशांचे जवळच पुनर्वसन करा

♦कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुला जवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा

♦पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा

अशी आहे पदयात्रा…

•१ सप्टेंबर : सकाळी 8 वाजता प्रयाग चिखली येथून पदयात्रेचा प्रारंभ. शिये येथे मुक्काम
•२ सप्टेंबर : सकाळी 8 वाजता शिये येथून प्रारंभ. चोकाक येथे मुक्काम.
• 3 सप्टेंबर : सकाळी 8 वाजता चोकाक येथून प्रारंभ. पट्टणकोडोलीत मुक्काम
•४ सप्टेंबर : सकाळी 8 वाजता पट्टणकोडोली येथून प्रारंभ. अब्दुललाट येथे मुक्काम
• ५ सप्टेंबर ः सकाळी 8 वाजता अब्दुललाट येथून प्रारंभ. नृसिंहवाडी येथे पदयात्रेची सांगता.

हेही वाचलं का ? 

Back to top button