कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांना बंडखोरांची धास्ती

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी बदली
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी बदली
Published on
Updated on

कोल्हापूर ; सतीश सरीकर : गेली दहा वर्षे कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी चा सत्तेचा झेंडा आहे. आता तर राज्यात सरकारही महाविकास आघाडीचे आहे. साहजिकच, महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून निवडणुकीला सामोरे गेल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार हे स्पष्ट आहे. त्याचा मोठा फटका आघाडीला बसून विरोधी भाजप-ताराराणी आघाडीला फायदा होऊ शकतो. बंडखोरीची धास्ती असल्यानेच पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगत आहेत.

महापालिकेच्या 2010 व 2015 या दोन्ही निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढविल्या. समविचारी पक्ष असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून महापालिकेवर झेंडा फडकविला. पाच वर्षे या दोन्हीच पक्षांनी सत्ता भोगली. 2015 मध्ये राष्ट्रवादीला वरचढ ठरत काँग्रेसने जागा जिंकल्या.

परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात हातावरच्या बोटावर मोजण्याइतपत संख्याबळाचा फरक होता. अवघे चार नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला डिमांड आले. परिणामी, काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेत सामावून घेतले. 2015-2020 च्या सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडीची सत्ता होती.

काँग्रेस – राष्ट्रवादीविरुद्ध भाजप – ताराराणी यांच्यात 'काँटे की टक्कर'

काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असले तरी निवडणुकीनंतर आघाडी होणार हे स्पष्ट आहे. स्वतंत्र लढणार असले तरीही 81 प्रभागांपैकी ज्या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार प्रबळ असेल तेथे राष्ट्रवादीचा दुबळा उमेदवार असेल. ज्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार तगडे असतील तेथे काँग्रेसचा किरकोळ उमेदवार असेल.

अशाप्रकारे काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढती होती. भाजप-ताराराणी आघाडी मात्र पूर्ण क्षमतेने निवडणुकीत उतरणार आहे. भाजपचे कार्ड चालणार नाही, अशा प्रभागात ताराराणी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार
आहेत.

भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्यावर सारी भिस्त असेल. एकूणच महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात 'काँटे की टक्कर' असणार आहे.

तुल्यबळ उमेदवार शोधण्याचे आव्हान…

काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे 81 प्रभाग आहेत. प्रभागरचना व आरक्षण निश्चित झाले आहेत. 81 प्रभागांत उमेदवार रिंगणात उतरायचे म्हटल्यावर दोन्ही पक्षांना 262 उमेदवार लागणार आहेत.

भाजप-ताराराणी आघाडी व शिवसेनाही सर्व प्रभागातून उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. त्याबरोबरच इतरही पक्षांचे उमेदवार असतील. अशाप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी आघाडी व शिवसेना या चार प्रमुख पक्षासाठी तब्बल 324 उमेदवारांची गरज आहे.

महापालिका निवडणूक म्हणजे किमान खर्चाची तयारी पाहिजे. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार शोधण्याचे आ?व्हान पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर व भाजप प्रवक्ते महाडिक यांच्यासमोर असणार
आहे.

शिवसेनाही पूर्ण ताकदीने उतरणार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याचा निर्धार केला आहे. परंतु, कोल्हापुरात काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका निवडणूक स्वतंत्रपणेच लढण्याचा निर्धार केला आहे. परिणामी, शिवसेनेचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेनेनेही कोल्हापूरवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी शहरातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी दिला आहे. नुकतेच 203 कोटींचा नगरोत्थान योजनेचा प्रस्तावही मंजूर केला आहे. परिणामी, शिवसेनाही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट आहे. सत्तेपर्यंत जाता आले नाही तरी किमान दोन अंकी नगरसेवकांचा आकडा गाठून किंगमेकर होण्यासाठी राजेश क्षीरसागर यांचा प्रयत्न असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news