राजू शेट्टी दूध संघवाल्यांचे पंटर : रघुनाथ पाटील | पुढारी

राजू शेट्टी दूध संघवाल्यांचे पंटर : रघुनाथ पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा  आंदोलन करून दूध उत्पादकांच्या हितापेक्षा दूध संघाचे हित पाहणारे माजी खासदार राजू शेट्टी हे दूध संघवाल्यांचे पंटर आहेत, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉल येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, उत्पादकांच्या दुधाला अपेक्षित भाव न देणार्‍या दूध संघांनी राजू शेट्टी यांच्यासारखा पंटर तयार केला आहे. दूध दरवाढ आंदोलन केल्यानंतर तडजोडी केल्या जातात.

दूध उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. सरकारने अडतेमुक्त व्यापार असा कायदा केला; परंतु बाजार समिती व व्यापार्‍यांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. अडत, हमाली व तोलाईदारांची रक्कम ही बिलात अ‍ॅडव्हान्स म्हणून शेतकर्‍यांकडून कापून घेतली जात आहे. यावर शेतकरी नेते असणारे व बाजार समितीचे आजी-माजी संचालक भगवान काटे आणि प्रा. जालंदर पाटील हे बाजार समितीच्या कारभारावर का बोलत नाहीत?

यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे, खंडेराव घाटगे, संजय रावळ, डी. आर. पाटील, बाळ नाईक, अनिता जाधव आदी उपस्थित होते.

महामार्ग हेच महापुराच्या नुकसानीचे कारण 

पाटील म्हणाले, महापुरासाठी अनेकजण अनेक कारणे सांगतात. यामध्ये पाऊस जादा पडला, हे प्रमुख कारण सांगितले जाते. परंतु, राष्ट्रीय महामार्गावर भराव टाकून वाढविलेल्या उंचीमुळे पुराचे संकट ओढवले आहे. नदीत भिंत बांधली पाहिजे, ही वक्तव्ये बालिशपणाची आहेत. अशा भिंती बांधून पूर थांबणार नाही. महामार्गावरील पुलाच्या कमानी विस्तारित करून त्यांची संख्या वाढविली पाहिजे, तरच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गावांचा पुराचा धोका कमी होऊ शकेल.

Back to top button