राजू शेट्टी यांचे पुन्हा ‘एकला चलो रे’! | पुढारी

राजू शेट्टी यांचे पुन्हा ‘एकला चलो रे’!

कोल्हापूर; विकास कांबळे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून शेतकर्‍यांचा मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेट्टी सध्या तरी महाविकास आघाडीसोबत आहेत. परंतु; त्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारवर केलेला हल्लाबोल पाहता शेट्टी पुन्हा ‘एकला चलो रे’च्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव होण्यापूर्वी राजू शेट्टी यांचा प्रवास चढत्या क्रमाने होता. त्याला लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत ब्रेक लागला. शेट्टी पूर्वी शरद जोशी यांच्यासोबत काम करत होते. परंतु; जोशी यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय शेट्टी यांना रुचला नाही. जातीयवादी संघटनांबरोबर आपले जमणार नाही, असे म्हणत त्यांनी सवता सुभा मांडला आणि 2002 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना करून ऊसदराच्या प्रश्नावर रान उठविण्यास सुरुवात केली. दुधाला भाव मिळावा म्हणूनही त्यांनी आंदोलन करत शेतकर्‍यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले.

विधानसभेची पहिली निवडणूक त्यांनी स्वतंत्रपणे स्वाभिमानीच्या नावावर लढविली. या निवडणुकीत साखरसम्राट तसेच प्रस्थापितांवर हल्लाबोल करत त्यांनी यश मिळविले. आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढविली. 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. आमदार असतानाच शेट्टी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उडी मारली आणि आमदारकीची मुदत संपण्यापूर्वीच ते खासदार झाले. त्यामुळे त्यांच्या चळवळीला अधिकच बळ मिळाले. साखरसम्राटांवर त्यांचा हल्लाबोल सुरूच होता. 2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलुख मैदानी तोफा होत्या. शेट्टी यांनी हे मैदान मारले. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचे ठरविले.

शरद जोशी भाजपसोबत गेल्यामुळेच शेट्टी यांनी त्यांची साथ सोडली होती; पण तेच शेट्टी भाजपसोबत गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र शेट्टी यांनी भाजपचीही साथ सोडत ज्यांच्याविरोधत ते आयुष्यभर लढले, त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसू लागले. हे मतदारांना न रुचल्याने त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.

निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चळवळ सुरू होती. मध्यंतरी विधानपरिषदेवर नियुक्तीची चर्चा सुरू झाली. बारा आमदार निवडायचे होते. त्यामध्ये राजू शेट्टी यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु; अद्याप ती नावे जाहीर झालेली नाहीत. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकर्‍यांना मदत करत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

शेतकर्‍यांना मदत मिळावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दौरे करून सभा घेतल्या. त्याला शेतकर्‍यांनीही साथ दिली. त्यामुळे या मोर्चात शेतकर्‍यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, शेट्टी यांनी हा मोर्चा काढू नये म्हणून त्यांना जिल्ह्यातील मंत्र्यांनी विनंती केली होती.

परंतु; शेट्टी यांनी त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. उलट मोर्चासमोर बोलताना त्यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांना चांगलेच फटकारले. एवढेच नव्हे तर त्यांनी जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याला ‘माझ्या नादाला लागू नका,’ असा दमच दिला. महाविकास आघाडीच्या सरकारवर त्यांनी केलेल्या हल्लाबोलमुळे आणि कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनातील सक्रिय सहभाग आणि त्या निमित्ताने भाजप नेतृत्वावर ते करत असलेली टीका पाहता शेट्टी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी कोणालाही अंगावर घेण्याची माझी तयारी आहे. मुळात शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली आहे. पदासाठी संघटना स्थापन केलेली नाही. निवडणुका येतील, जातील. त्या-त्या वेळी निर्णय घेतले जातील. परंतु; आज पूरग्रस्त शेतकर्‍यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. ती त्यांना मिळत नाही, तोपर्यंत सरकार कोणाचेही असेना, त्यांच्या विरोधात हल्लाबोल सुरूच राहील. – राजू शेट्टी, माजी खासदार

Back to top button