

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंगळवारी इस्लामपुरात माजी खा. राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाच्या निमित्ताने शेट्टी यांनी पुन्हा भाजपची जवळीक केली आहे.
शनिवारी मोर्चानिमित्त झालेल्या बैठकीत भाजपचे माजी आ. शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीकडून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत राजू शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर स्वकीयांनीच एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शेट्टी यांना आमदारकी मिळणार याबाबत चर्चा होती. मात्र, आजपर्यंत त्यांना महाविकास आघाडीने आमदारकी पासून दूर ठेवले.
इस्लामपुरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करून शेट्टी यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आव्हान दिले आहे. या मोर्चाला भाजपचे बळ मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.