पुण्यात दुचाकी इथेनॉलवर धावणार - पुढारी

पुण्यात दुचाकी इथेनॉलवर धावणार

पुणे : नरेंद्र साठे

पुणे शहरातील दुचाकी आता इथेनॉलवर धावणार आहेत. राज्य शासनाने पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर दुचाकी वाहनांना शंभर टक्के इंधन म्हणून इथेनॉल विक्रीस परवानगी दिली असून, पेट्रोलपेक्षा स्वस्त मिळणार्‍या इथेनॉल वापराच्या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादन करणार्‍या साखर कारखान्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने तेल उद्योगाच्या राज्यस्तरीय समन्वयकांना पुण्यात दुचाकींना इथेनॉल वापरण्यास शासनाची हरकत नसल्याचे पत्र दिले आहे. हे पत्र दै. ‘पुढारी’च्या हाती लागले .

पुण्यामध्ये या पद्धतीची रचना चांगली राबविली गेली, तर पेट्रोलवर होणार्‍या खर्चामध्ये बचत होणार आहे. त्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या अर्थकारणाला बळकटी येईल. आजारी साखर कारखान्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होईल. ऑटोमोबाईल क्षेत्रापासून सर्वच क्षेत्रातील अनेकांना यामुळे काम करण्यास संधी उपलब्ध होणार आहे. कारण इथेनॉल वापरण्यापूर्वी वाहनामध्ये काही पद्धतीच्या रचना, दुरुस्ती करून बदल करावे लागणार आहेत.

इथेनॉल हे ए-क्लास पेट्रोलियम पदार्थांतर्गत समाविष्ट असल्याने प्रचलित पेट्रोल, डिझेल पंपांना लागू असलेले सुरक्षाविषयक निकष लागू असणार आहेत. यात इथेनॉलची साठवणूक, सुरक्षित अंतर, अग्निशमन व्यवस्था आवश्यक असणार आहे. हे सर्व निकष पाळून पंपावर इथेनॉलची विक्री करता येणार आहे.

इथेनॉलच्या विक्रीवर वस्तू व सेवाकर 18 टक्के व सेवा कराची आकारणी करण्यात येणार आहे. तसेच विक्रीसाठी राज्य वस्तू व सेवाकर विभागामार्फत कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसेल. त्याचबरोबर विक्री व विपणन यावरसुद्धा राज्य कर विभागाचे कोणतेही निर्बंध लागू असणार नाहीत.

पेट्रोलप्रमाणेच इथेनॉल ए क्लास पेट्रोलियम पदार्थ असल्याने पेट्रोल, डिझेलप्रमाणेच वाहतुकीसाठी केेंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेले नियम इथेनॉलच्या वाहतुकीसाठी लागू असणार आहेत.

Back to top button