इचलकरंजी : खा. धैर्यशील माने गटाच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता | पुढारी

इचलकरंजी : खा. धैर्यशील माने गटाच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : भाजप-शिंदे गटात इनकमिंग सुरू असतानाच आता कोल्हापुरातील खासदार काय करणार, याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली असताना, खासदार धैर्यशील माने यांची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट दिसत नाही. रविवारी दुपारी बेळगावमार्गे त्यांनी तातडीने राजधानी दिल्‍लीकडे टेकऑफ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, सायंकाळी 6 नंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत. एकंदरीत, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ—माचे वातावरण असून, अस्वस्थता आहे.
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत माने शिवसेनेच्या तिकिटावर पान 4 वर

विजयी झाले. या मतदारसंघातील जातीय समीकरण आणि भाजपची रसद पाठीशी राहिल्यामुळे माने यांचा विजय सुकर झाला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी करीत खळबळ उडवून दिली. पहिल्यापासूनच खासदार माने त्यांच्यासोबत जाणार, अशी चर्चा होती. खा. माने आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे अतिशय निकटचे संबंध आहेत. त्यामुळे खा. मानेच शिवसेनेच्या खासदार गटात खिंडार पाडतील, अशी हवा तयार झाली होती. परंतु, अनेक जाणकारांचे अंदाज फोल ठरवत खा. माने उद्धव ठाकरे यांच्यासोबतच दिसू लागले. त्यामुळे या चर्चेला काहीसा विराम मिळाला होता.

परंतु, खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्याचे संकेत दिल्यानंतर खा. माने काय करणार, या चर्चेने पुन्हा जोर धरला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. उद्यापासून सुरू होणार्‍या संसदेच्या अधिवेशनासाठी ते दिल्‍लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशनादरम्यान ते भूमिका जाहीर करतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Back to top button