प्रकाश आबिटकरांनी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांची पोस्ट डिलीट का केली?; चर्चेला उधाण | पुढारी

प्रकाश आबिटकरांनी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांची पोस्ट डिलीट का केली?; चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये पहिल्या दिवसापासून सोबत असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड-राधानगरी मतदारसंघातील आमदार प्रकाश आबिटकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रकाश आबिटकरांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्यांनी काही वेळाने ती पोस्ट डिलीट केली. सोशल मीडियावर या पोस्ट संदर्भात तर्क-वितर्क केले जात आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकानंतर एकनाथ शिंदें यांनी बंडखोरी केली. त्यांना शिवसेनेचे बहुतांश आमदार जाऊन मिळाले. त्यामध्ये राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हेही होते. या दरम्यान बंडखोर आमदारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये बंडखोर आमदार “एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” अशा घोषणा देत होते. यावेळी अन्य आमदार आबिटकरांना म्हणत होते की, “आबिटकर घाबरु नका.. पुढे या..” हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आबिटकर यांनी सुरतच्या हॉटेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता असे शिवसेनेच्या एका आमदाराने पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. दरम्यान, गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये सही करण्याच्या कारणावरून आमदार प्रकाश आबिटकर आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचेही अफवा पसरली होती. पण या वृत्ताला  शिवसेना नेते संजय राऊत यांनीही  दुजोरा दिला होता. या कारणांनी आबिटकर चर्चेत होते. आता ते पुन्हा पोस्ट डिलीट करण्यावरुन चर्चेत आले आहेत.

आमदार प्रकाश आबीटकरांनी डिलीट केलेली पोस्ट
आमदार प्रकाश आबीटकरांनी डिलीट केलेली पोस्ट

शुभेच्छांची पोस्ट डिलीट

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  शपथ घेतल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकरांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर शेअर केले होते. हे पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येवू लागल्या. काही वेळातच प्रकाश आबिटकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट डिलीट केली.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रकाश आबिटकरांनी ही पोस्ट डिलीट करताच मात्र सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. या काही दिवसात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमूळे काही कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी केलेल्या या पोस्टवर त्यांच्या भूमिकेचेही पडसाद पडत होते. त्यावर संमिश्र अशा प्रतिक्रिया येत होत्या. आबिटकरांच्या या कृतीची चर्चा मात्र सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर या पोस्टचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत. शिंदे सरकारला अजून बहुमत सिद्ध करायचे आहे. यामध्ये खुद्द बंडखोर आमदारांच्यात मतभेद आहेत की काय अशीही चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button