...तर शिवसेनेच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलू, शिंदेंवरील कारवाईनंतर दीपक केसरकरांचा इशारा | पुढारी

...तर शिवसेनेच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलू, शिंदेंवरील कारवाईनंतर दीपक केसरकरांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि. २) गोव्यात पत्रकार परिषदेत गटाची भूमिका स्पष्ट केली.
केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेते पदावरून काढण्यात आले आहे. ही कारवाई लोकशाहीला अजिबात शोभणारी नाही. त्याचबरोबर शिवसेनेसाठी शोभनीयही नाही. या कारवाईविरोधात शिवसेनेच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलू. कारण आम्हालाही कायदेशीर मार्ग निवडण्याचा अधिकार आहे.

केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याला आव्हान दिले जाईल, त्याचा लोकशाहीवर परिणाम होईल.  शिंदे सभागृहाचे नेते होते. आता ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यावर शिवसेनेने कारवाई करत गटनेते पदावर काढून टाकले आहे. याविरोधात शिवसेनेला रितसर उत्तर पाठवू. शिंदेविरोधातील ही कारवाई शिवसेनेसाठी शोभनीय नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही आदर आहे. त्यांच्या वक्तव्यावर कोणत्याही प्रकारे आम्ही उत्तर देणार नाही. की शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यामुळे सेलिब्रेशन करणार नाही.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत वेगळा गट निर्माण केला. त्यानंतर आता शिवसेनेने राज्यभरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. यावरही केसरकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांनी पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नव्हे, तर प्रेमाचे बंधन आवश्यक आहे. शिवबंधन हे प्रेमाचे बंधन आहे. त्यामुळे वेगळे प्रतिज्ञापत्र घेण्याची गरजच काय ? असा सवाल त्यांनी केला आहे. २० रूपयांचा वडापाव खाणाऱ्यांना १०० रूपयांचा प्रतिज्ञापत्र का ? असेही ते म्हणाले.

उद्धवसाहेबांच्या वक्तव्याविरोधात आम्ही बोलणार नाही. ते आमचे नेते आहेत असा आमचा अजूनही विश्वास आहे, आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत पण त्याला मर्यादा आहेत. शिवसेना सोडणार नसल्याच्या १०० रुपयांच्या शपथपत्रावर कार्यकर्ते स्वाक्षरी करत आहेत. शिवबंधन व्यक्ती शिवसेनेत आल्यावर बांधलेले हे प्रेमाचे ‘बंधन’ आहे आणि ते अजूनही आपल्यासोबत आहे. हे केवळ कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी सुरू असल्याची टीकाही केसरकर यांनी केली.

हेही वाचलंत क? 

Back to top button