नगर : काय संघटना……काय नेते….काय अधिकारी!

नगर : काय संघटना……काय नेते….काय अधिकारी!
Published on
Updated on

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी कंपनी विरोधात आक्रोश करत असताना, शेतकर्‍यांच्या नावाखाली राजकारणात स्वतःची पोळी भाजून घेणारे राजकीय पुढारी, शेतकर्‍यांच्या नावाखाली चालणार्‍या संघटना गप्प का? तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांच्या चुप्पीमागील गौडबंगाल काय? असा संतप्त सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित होेत आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गालगत गॅस पाईपलाईनचे मनमानी काम सुरू आहे. सर्व नियम, अटी धाब्यावर बसवून सदर काम चालू आहे. अनेक शेतकरी, व्यावसायिकांनी या गॅस पाईपलाईनच्या कामाला विरोध केला. परंतु, संबंधित ठेकेदारावर काहीही फरक पडला नाही. शेकडो झाडांची कत्तल, शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात चर, त्यामुळे पिकांचे झालेले नुकसान, व्यावसायिकांसमोर चर खोदून कित्येक दिवस रस्ता बंद ठेवण्यात आल्याने व्यावसायिकांचे नुकसान, चर खोदल्याने झालेले गाळाचे साम्राज्य, महामार्गावरील अनेक लहान लहान पूल बंद करण्यात आल्याने शेतकर्‍यांचे बांध फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतकर्‍यांची मोठमोठी फळझाडेही तोडण्यात आलेली आहेत.

रस्त्यावर माती, मुरुम टाकण्यात येत आहे. तसेच, पाईपलाईनचे काम करणारी वाहने मधोमध उभी राहत आहेत. अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत. त्यात अनेकांचा बळी गेला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. विजेचे पोल शिफ्टिंग करण्यात आले. एवढा अनागोंदी कारभार सुरू असून देखील त्या विरोधात प्रशासन कारवाई करेना की कोणती संघटना, राजकीय पुढारी आवाज उठविताना दिसून येत नाही, हे शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे.

परिसरातील शेतकरी या गॅस पाईपलाईनच्या कामास विरोध करत आहेत. परंतु, संबंधित ठेकेदाराच्या मनमानी विरोधात शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जेऊर परिसरातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. जेऊर परिसरातील सरपंचांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच, संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, काहीही कारवाई होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

शेतकर्‍यांच्या असंतोषातून येथे गॅस पाईपलाईनचे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून, भविष्यात अनुचित प्रकार घडू शकतो. शेतकरी, व्यावसायिक व अपघातग्रस्तांना तात्काळ झालेल्या नुकसानीची मदत मिळण्याची मागणी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नाही, असा पवित्रा जेऊर परिसरातील शेतकरी व व्यावसायिकांनी घेतला आहे.

नुकसानीची परवानगी दिली काय?
संबंधित कंपनी व ठेकेदाराला शेतकर्‍यांची नुकसान करण्याची परवानगी देण्यात आली आहे काय? संबंधित ठेकेदार, कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर येऊन त्यांना कायदा दाखविण्यात येईल, असा संतप्त इशारा जेऊर परिसरातील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

काम करू न देण्याचा निर्धार
संघटना, पुढारी तसेच अधिकारी यांना विनंती अर्ज करून देखील आमच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यांचा निषेध करत जेऊर पंचक्रोशीतील व्यावसायिक व शेतकरी यांनी संबंधित काम करू न देण्याचा निर्धार केला आहे. आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

'त्या' अधिकार्‍यांची चौकशी करा
संबंधित ठेकेदार, कंपनीला वृक्षतोड, विजेचे पोल शिफ्टिंग तसेच इतर परवानगी देण्यात येणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित अधिकार्‍यांनी कोणत्या पद्धतीने परवानगी दिल्या, याची शेतकर्‍यांना जाणीव झाली असून, संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रशासनाची चुप्पी का?
गॅस पाईपलाईनच्या कामात एवढा सावळागोंधळ असून सुरू आहे. शेतकरी, व्यावसायिक यांचे नुकसान त्याचबरोबर झालेले अपघात याबाबत प्रचंड विरोध होत असताना, प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याने या मागचे गौडबंगाल काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news