कागल तालुक्यातून अपहरण झालेल्‍या मुलाचा खून | पुढारी

कागल तालुक्यातून अपहरण झालेल्‍या मुलाचा खून

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथून मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आजोबांच्या घरातून अपहरण करण्यात आलेल्या सात वर्षीय शाळकरी मुलाचा अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा प्रकार आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आला.

ताजी अपडेट :  खुनाचा प्रकार नरबळीतूनच : वडिलांच्या मित्रानेच अपत्यप्राप्तीसाठी बळी दिल्याचे समोर आले आहे.  अटक केलेल्या संशयिताचे नाव  मारुती तुकाराम वैद्य असे आहे. तपासाची स्थिती आणि गावातील परिस्थिती इथे वाचा. 

या घटनेमुळे कागल तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. वरद रवींद्र पाटील (वय ७, रा. सोनाळी, ता. कागल) असे या मुलाचे नाव आहे.

खडणी, वसुली किंवा नरबळीसाठी हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा संशय आहे. आजोबा दत्तात्रेय शंकर महातूगडे (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल) यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावर्डे बुद्रुक येथील गाव तलावात मुलाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे. आजोबा दत्तात्रेय मातूगडे यांनी सावर्डे बुद्रुक येथे नवीन घर बांधले आहे. घराच्या वास्तुशांतीसाठी डॉक्टर रवींद्र पाटील त्यांच्या पत्नी व मुलगा वरद सावर्डे बुद्रुक येथे गेले होते. दिवसभर घरातील सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वरद रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गायब झाला.

वडील आणि नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला. पण वरद सापडला नाही. मुरगूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मुरगूड कागल पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात व कर्नाटकातही मुलाचा शोध घेतला. पण त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह गाव तलावात आढळून आला. त्याच्या अंगावर जखमांचे व्रण आहेत. त्यामुळे अमानुष मारहाण करून मुलाचा खून करण्यात आला असावा तसेच यामागे नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे कागल तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

Back to top button