सियाचीन हॉस्पिटल जवानांसाठी जीवनरक्षक : लेफ्टनंट जनरल जोशी | पुढारी

सियाचीन हॉस्पिटल जवानांसाठी जीवनरक्षक : लेफ्टनंट जनरल जोशी

जम्मू : हरिष पाटणे

दै. ‘पुढारी’ने उभारलेले सियाचीन सैनिक हॉस्पिटल जवानांसाठी जीवनरक्षक असल्याचे गौरवोद‍्गार लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी काढले. सियाचीन हॉस्पिटल उभारणीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ते बोलत होते. ‘पुढारी’ पेपर्सचे चेअरमन डॉ. योगेश जाधव हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ले. ज. जोशी यांनी त्यांचे स्वागत करून या हॉस्पिटलच्या उभारणीबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली.

जगातील सर्वोच्च रणभूमीवर हे हॉस्पिटल 2001 साली उभारण्यात आले. 2011 साली या हॉस्पिटलच्या दशकपूर्तीनिमित्त त्यावेळचे नॉर्दर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल पारनाईक यांनी भारतीय सेनेच्या वतीने एक समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ‘सियाचीन अस्पताल के जनक’ असा गौरवपूर्ण उल्‍लेख असलेल्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळीही ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, श्रीमंत शाहू महाराज, डॉ. अभय शिर्के, डॉ. दिलीप पठाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आता द्विदशकपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम नॉर्दर्न कमांडचे हेडक्‍वार्टर असलेल्या जम्मू उधमपूर येथे पार पडला.

डॉ. योगेश जाधव
सियाचीनलगतच्या उधमपूर येथील नॉर्दर्न कमांडमध्ये भारतीय सैन्यदलाची प्रतिकृती देऊन ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांचे स्वागत करताना लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी.

जवानांना अत्याधुनिक सुविधा

2001 साली दै. ‘पुढारी’ने सियाचीनमध्ये सैनिकांच्या हॉस्पिटलसाठी अत्याधुनिक इमारत उभारली. त्यामुळेच बहुतांशी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा जवानांना मिळणे शक्य झाल्याचे लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हॉस्पिटलचा अंतर्गत भाग उबदार राहतो. या हॉस्पिटलला 20 वर्षे पूर्ण झाली असून इमारत भक्‍कमपणे उभी आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसह पुरेशा प्रमाणात स्टाफ आहे. येथे वातावरणामुळेच अनेक प्रकारच्या व्याधी होतात. त्यामुळे त्या व्याधींचे निराकरण करणे हे आव्हानात्मक असते. सर्व सोयींनी सुसज्ज अशा या सैनिक हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या आणि आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध असल्याने या व्याधींचे निराकरण तत्काळ करून त्यावर योग्य ते उपचार करणे शक्य झाल्याचे जोशी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

सियाचीन हॉस्पिटलमुळेच 16 हजार फुटांपर्यंत सैनिक तैनात करणे शक्य

या सैनिक हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन, ऑक्सिजन प्लांटसह रेडिओलॉजी यंत्रणा कार्यान्वित आहे. तसेच स्वतःची ऊर्जाप्रणाली आहे. या हॉस्पिटलमुळेच तीन हजार फुटांपासून ते 16 हजार फुटांपर्यंत सैनिक तैनात करणे शक्य झाल्याचे गौरवोद‍्गार काढून जोशी म्हणाले की, सियाचीन सैनिक हॉस्पिटल हे मध्यपूर्व भागासाठी जीवनरक्षक आहे. कारण या हॉस्पिटलमुळेच अनेक आजारांचे निदान वेळेवर होऊन त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने जवानांचे जीव वाचविणे शक्य होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या द्विदशकपूर्ती कार्यक्रमानिमित्त जम्मू उधमपूरच्या नॉर्दर्न कमांडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘पुढारी’ पेपर्सचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी वीस वर्षांतील आठवणींना उजाळा देताच संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्‍तीचे रोमांच उभे राहिले. या हॉस्पिटलची द्विदशकाची वाटचाल अत्यंत गौरवशाली आहे.

तब्बल 80 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या एव्हरेस्ट पराक्रमाची साक्ष म्हणजेच हे सियाचीन सैनिक हॉस्पिटल असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

राष्ट्रभक्‍तीच्या सर्वोच्च पराक्रमाची द्विदशकपूर्ती

हिमालयाच्या पर्वतराजीत काराकोरम रांगामधील जगातील सर्वोच्च रणभूमी असलेल्या सियाचीनच्या परतापूर येथे 18 नोव्हेंबर 2001 रोजी देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते व ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सियाचीन सैनिक हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रभक्‍तीच्या या सर्वोच्च पराक्रमाची द्विदशकपूर्ती सैनिकांना स्फूर्तिदायक ठरली आहे.

द्विदशकपूर्तीचे औचित्य साधून या रणभूमीवर दै. ‘पुढारी’च्या वतीने आणखी एक दालन सुरू करावे या उद्देशाने ‘पुढारी’ पेपर्सचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘पुढारी’ची टीम सियाचीन भागातील उधमपूर येथे दाखल झाली आहे.

भारतीय लष्कराच्या वतीने डॉ. योगेश जाधव यांचे स्वागत

यासाठी डॉ. योगेश जाधव यांचे जम्मू विमानतळावर आगमन होताच भारतीय लष्कराच्या वतीने त्यांचे शानदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी उधमपूर नॉर्दर्न कमांडचे मेजर जनरल सुजित शिवाजीराव पाटील लष्कराच्या वतीने उपस्थित होते.

हॉस्पिटलबद्दल जवानांबरोबरच स्थानिक जनतेतही कृतज्ञता

यावेळी मेजर जनरल पाटील यांनी उधमपूरची पार्श्‍वभूमी आणि स्थानिक लोकजीवनाची माहिती देत असतानाच डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रेरणेने उभारण्यात आलेल्या सियाचीन हॉस्पिटलचा गौरवपूर्ण उल्‍लेख केला. जवानांबरोबरच स्थानिक नागरिकांमध्ये याविषयी कृतज्ञतेची भावना असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

गेस्ट ऑफ ऑनर

आर्मी कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या शाही शामियान्यात डॉ. योगेश जाधव यांना मेजर जनरल सुजित पाटील यांनी ‘गेस्ट ऑफ ऑनर’ दिला. लष्कराने दिलेला हा ‘गेस्ट ऑफ ऑनर’ स्वीकारताना डॉ. योगेश जाधव भारावून गेले.

सैन्य दलाची प्रतिकृती देऊन डॉ. जाधव यांचा गौरव

नॉर्दन कमांडच्या खास आर्मी कॅनव्हायमधून डॉ. योगेश जाधव मेजर जनरल सुजित पाटील यांच्यासह नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयाकडे रवाना झाले. या मुख्यालयात नॉर्दर्न कमांडचे जीओसी इन चिफ लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांच्या कार्यालयात डॉ. जाधव यांचे आगमन झाले. त्याप्रसंगी आर्मी प्रोटोकॉलप्रमाणे लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी भारतीय सैन्य दलाची प्रतिकृती देऊन डॉ. योगेश जाधव तसेच ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांचे स्वागत केले.

‘पुढारी’च्या वतीने द्विदशकपूर्ती स्मृतिचिन्ह देऊन गौरव

डॉ. योगेश जाधव यांनी सियाचीन सैनिक हॉस्पिटलच्या द्विदशकपूर्ती वाटचाल दाखविणारे खास स्मृतिचिन्ह लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांना भेट दिले.

वैभवशाली वारसा उलगडला

यावेळी ‘पुढारी’चा वैभवशाली वारसा उलगडताना डॉ. योगेश जाधव यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ‘पुढारी’ने एक वृत्तपत्र या नात्याने योगदान दिल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, आपले आजोबा व ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांनी महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतही डॉ. ग. गो. जाधव यांनी काम केले होते. मुंबईत ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले तेव्हा आपला सत्कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या हस्ते व्हावा, अशी इच्छा डॉ. आंबेडकर यांनी बोलून दाखविली होती. त्यानुसार हा सत्कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या हस्ते झाल्याचे डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले.

वडील आणि मुलगा दोघांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव

दै. ‘पुढारी’ची 80 वर्षांची ही देदीप्यमान वाटचाल आणि गौरवशाली वारसा चालविण्याचे काम आपले वडील आणि ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव करीत आहेत. वडील आणि मुलगा अशा दोघांनाही भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले. हा भारतीय इतिहासातील दुर्मीळ योगायोग असल्याचेही डॉ. योगेश जाधव म्हणाले.

‘पुढारी’चे बहुमोल योगदान

महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात ‘पुढारी’चे योगदान बहुमोल असल्याचा उल्‍लेख वाय. के. जोशी यांनी यावेळी केला.

या चर्चेत ‘पुढारी’ची भारतीय सैन्यदलाबाबतची आत्मीयता, सियाचीनसारख्या जगातील सर्वोच्च रणभूमीवर सैनिकांसाठी हॉस्पिटल उभारण्याची ‘पुढारी’कारांची किमया, गेल्या वीस वर्षांत सियाचीन हॉस्पिटलच्या वाटचालीसाठी ‘पुढारी’कडून करण्यात येत असलेले सहकार्य, शत्रूशी लढताना आणि सीमेचे संरक्षण करताना सर्वोच्च अधिकार्‍यांपासून ते सैनिकांपर्यंत येत असलेल्या अनुभवाची चर्चा यावेळी झाली.

‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी ‘पुढारी’च्या वाटचालीचा परामर्ष घेत राष्ट्रभक्‍तीने प्रेरित असलेले ‘पुढारी’ हे वृत्तपत्र समाजसेवेचे व्रत घेऊन कार्यरत असल्याचे सांगितले.

‘पुढारी’च्या टीममध्ये राजवीर योगेश जाधव, ऋतुराज मंदार पाटील, विश्‍वविजय खानविलकर, ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरिष पाटणे, रणजित झेंडे यांचा समावेश आहे.

यावेळी डॉ. योगेश जाधव यांनी मेजर जनरल सुजित पाटील यांना अंबाबाईची मूर्ती भेट दिली.

‘पुढारी’का काँट्रिब्युशन देश के लिए महत्त्वपूर्ण

या चर्चेवेळी नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या देशभक्‍तीने आपला ऊर अभिमानाने भरून आला आहे, असे म्हणत त्यांनी थेट डॉ. जाधव यांच्याशी फोनवर बातचीत सुरू केली. यावेळी जोशी म्हणाले की, ‘आप के बारे में बहुत सुना था । सियाचीन और आप की फोटो गॅलरी देख के आप के उपर हम गर्व महसूस कर रहे है । ‘पुढारी’ने जो काँट्रिब्युशन सैनिकों के लिए दिया है, वो देश के लिए बहुत महत्त्वपूर्ण रहा है।’ यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ले. ज. जोशी यांना कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

सियाचीन हॉस्पिटल की डॉ. प्रतापसिंह जाधवजीं की कल्पना राष्ट्रभक्‍ती से प्रेरित : लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी

सियाचीन हॉस्पिटल

‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांना सियाचीन सैनिक हॉस्पिटलच्या उभारणीबाबतची विस्तृत माहिती दिली. त्यावर ‘मुझे यह बताओ प्रतापसिंहजीं की हॉस्पिटल बनाने की प्रेरणा कहाँ से आयी।’ त्यावर डॉ. योगेश जाधव यांनी हॉस्पिटल उभारणीपूर्वीचा संपूर्ण अनुभव लेफ्टनंट जनरल जोशी यांना सांगितला.

डॉ. जाधव म्हणाले, पाकिस्तानी लष्कराने 1999 च्या दरम्यान कारगिलमधील भारतीय भूमीत आक्रमण केले होते. शत्रूशी लढताना अनेक भारतीय जवानांना वीरमरण आले होते. संपूर्ण देशभरात रणयज्ञ सुरू होता. याच कालावधीत नवी दिल्‍लीतील सेना मुख्यालयाचे अतिरिक्‍त महानिदेशक मेजर जनरल पुरुषोत्तम दत्ता यांचे ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पत्र आले.

आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड हा जवानांच्या कल्याणासाठी उभा केला जातो. या निधीसाठी जनतेने सहाय्य करावे, असे आवाहन ‘पुढारी’तून प्रसिद्ध करावे, असे दत्ता यांनी म्हटले होते. मात्र, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी जवानांसाठी निधी उभारण्याचे काम हे राष्ट्रीय कार्य मानले आणि ‘जरा याद करो कुर्बानी’ या मथळ्याखाली हे आवाहन प्रसिद्ध झाले.

त्याला एवढा प्रतिसाद मिळाला की महाराष्ट्रातील सर्व ठिकाणांमधून मदतीचा पूर लोटला. अवघ्या दीड-दोन महिन्यांत अडीच कोटींच्या घरात निधी जमा झाला. या निधीचा पुरेपूर विनीयोग व्हावा, ही डॉ. प्रतापसिंह जाधव यांची इच्छा होती. याच कालावधीत डॉ. जाधव यांचे मित्र मेजर जनरल शिवाजीराव पाटील यांचा सैन्यात कॅप्टन असलेला मुलगा कारगिलच्या रणभूमीवर लढताना जखमी झाला. सियाचीन येथे उपचारासाठी कोणतीही सोय नव्हती. थेट एअरक्राफ्टने चंदीगडला नेण्याशिवाय पर्याय नव्हता.

मात्र, प्रतिकूल हवामान, हेलिकॉप्टरची सेवा ठप्प अशा परिस्थितीत काय करावे? डॉ. जाधव यांनी थेट संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनाच फोन लावला. सियाचीन येथे हॉस्पिटल का नाही? अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा हॉस्पिटल लालफितीत अडकले असल्याची वस्तुस्थिती फर्नांडिस यांनी मांडली. हॉस्पिटल उभारणीसाठी खर्च किती येईल त्याचे इस्टिमेट पाठवावे म्हणजे तसा निधी उभा करता येईल, असे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी फर्नांडिस यांना सांगितले.

आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडात जमा झालेला निधी सर्वच कामांसाठी एकत्रित स्वरूपात वापरला जातो. विशिष्ट निधी विशिष्ट कामासाठी वापरता येत नाही. मात्र, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी या निधीतून सियाचीन हॉस्पिटलची संकल्पना मांडली. जॉर्ज फर्नांडिस यांनी या कल्पनेला संमती दिली. त्यातून हॉस्पिटलसाठी हा निधी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आणि कोल्हापुरात हा निधी संरक्षणमंत्री असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे जनतेच्या साक्षीने सुपूर्द करण्यात आला.

या निधीतून सियाचीन येथे हॉस्पिटलच उभे राहिले पाहिजे, असा आग्रह डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी धरला आणि 2001 च्या नोव्हेंबर महिन्यात सियाचीन येथे सैनिकांसाठी हॉस्पिटल उभे राहिले. त्याचे उद्घाटनही संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस व डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याच हस्ते झाले. हा संपूर्ण घटनाक्रम डॉ. योगेश जाधव यांनी लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांना सांगितला. तेव्हा ते कमालीचे अचंबित झाले. ‘प्रतापसिंह जाधवजींकी यह कल्पना राष्ट्रभक्‍तीसे प्रेरित है।’ असे गौरवोद‍्गार जोशी यांनी काढले.

Back to top button