पन्हाळगडावर मुसळधार पाऊस : नव्या रस्त्यावर धबधब्यासारखे लोट | पुढारी

पन्हाळगडावर मुसळधार पाऊस : नव्या रस्त्यावर धबधब्यासारखे लोट

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा येथे आज (दि.११) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मान्सून पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावून गेले. मुसळधार पाऊस झाल्याने पन्हाळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाण्याचे लोट वाहले. पहिल्याच पावसात नव्या जिओ ग्रेड तंत्रज्ञानाने बांधकाम केलेल्या रस्त्यावरुन धबधबा सदृश पाण्याचे लोट वाहिले. त्यामुळे खाली पडणारे पाणी मंगळवार पेठेतील काही घरात शिरले. त्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली.

धबधब्यासारखे पाण्याचे लोट पाहून पर्यटकांना ‘भुशी डॅम’ची आठवण झाली. काही पर्यटकांनी या ठिकाणावरून सेल्फी देखील काढल्या. या रस्त्याचे रेलिंगचे काम अजून पूर्ण नसल्याने या ठिकाणी सेल्फी घेण्यास जाणे धोक्याचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर पन्हाळ्यातून खाली मंगळवार पेठेच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

दरम्यान, मंगळवार पेठ व नेबापूरचे सरपंच व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करूनच पाण्याची निर्गत करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ९ हजार क्यूबिक माती हलवली आहे. दगड गोटे टाकून पाण्याच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येईल. मात्र, जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीने काही तरतूद करून घेणे आवश्यक आहे, असे पन्हाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांनी सांगितले.

सेल्फी काढण्यासाठी लोक पायऱ्या उतरून जात होते. हे धोकादायक आहे, असे प्रकार होऊ नये, त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची नाही. रेलिंग पूर्ण झाल्याशिवाय कोणीही या भागात जाऊ नये, असे आवाहन पन्हाळ्याचे कनिष्ठ अभियंता अमोल कोळी यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button