fraud : पुणे, साकोलीत कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला अटक | पुढारी

fraud : पुणे, साकोलीत कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला अटक

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधून चांगला परतावा देतो, असे सांगून पुणे येथील अनेक लोकांना कोट्यवधींचा चुना लावून (fraud) फरार झालेल्या पती-पत्नीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले. साकोली तालुक्यातील डॉ. नाशिक कापगते व त्याची पत्नी आशा कापगते या दोघांना पुणे पोलिसांनी रायपूर येथून शुक्रवारी (दि.१०) ताब्यात घेतले.

(fraud) कापगते  दाम्पत्याने पुणे येथे जाण्याअगोदर साकोली परिसरातील शेकडो लोकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. त्यानंतर साकोलीतून पसार होऊन त्यांनी पुणे येथे आपले बस्तान मांडले. २०१७ पासून पुणेकरांना शेअर मार्केटमध्ये दामदुप्पट परतावा देतो, म्हणून त्यांनी फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. पुण्यात देखील लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. ऑगस्ट २०२१ पासून पती – पत्नी पुण्यातून फरार झाले होते. पुण्यातील फसलेले गुंतवणूकदार यांनी फसवणुकीची तक्रार अलंकार पोलीस स्टेशन, पुणे येथे दाखल केली होती. ऑगस्ट २०२१ पासून पुणे पोलीस त्यांच्या मागावर होते. १० जूनला छत्तीसगढ राज्यातील रायपूर शहरात पुणे पोलिसांनी कापगते  दाम्पत्याला अटक केली.

fraud : साकोलीत अनेकांना गंडविले

डॉ. नाशिक कापगते याने २०१७ पूर्वी साकोली परिसरातील अनेक जणांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. अनेकांनी आपल्या घामाचे पैसे यांच्या स्वाधीन केले. सुरूवातीला नियमितपणे परतावा दिल्यामुळे लोकांचा त्‍यांच्‍यावर विश्वास बसला. लालसेपोटी अनेक जण त्यांच्या जाळ्यात अडकले व सर्वस्व गमावून बसले. या फसवणूक प्रकरणात साकोली तालुक्यासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चारही जिल्ह्यातील अनेक जण देशोधडीला लागले असल्याची चर्चा होती. मात्र, पुराव्यांअभावी तक्रारदारांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक जणांना काहीही करता आले नाही.

पुराव्यांअभावी तक्रार नाही

२०१७ मध्ये साकोली पोलीस स्टेशनला काही लोक फसवणुकीच्या तक्रारी घेऊन गेले होते. मात्र, पुरावे नसल्याने तक्रारी दाखल केल्या गेल्या नव्हत्या. चेक बाऊंसचे प्रकरण गुन्हे विभागाअंतर्गत येत नसल्याने सरळ न्यायालयात गेले. तिथून संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर अनेकदा नोटीस पाठविण्यात आले. मात्र, डॉ. नाशिक कापगते पत्त्यावर राहत नसल्याने नोटीस कोणीही न स्वीकारल्याने काही वर्षानंतर न्यायालयाने हे प्रकरण फेटाळले केले होते.

‘ते’ बडे असामी कोण?

डॉ. कापगते याच्या प्रलोभनाला बळी पडून साकोली परिसरातील अनेक बड्या असामींनी पैसे गुंतविले. परंतु, पैसे गुंतविताना त्यांच्याकडे कोणतीही पावती दिली नाही. विशेष म्हणजे डॉ. कापगते हा सर्व आर्थिक व्यवहार आपल्या वडिलांच्या बँक खात्यावरुन करीत होता. आता पैसे बुडाल्याने हे बडे असामी गप्प आहेत. कारण तक्रार केली. तर त्यांना पैशांचा लेखाजोखा द्यावा लागेल. त्यामुळे हे असामी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button