

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील रोहिणी परिसरात एका रुग्णालयाला शनिवारी पहाटे आग (Hospital fire) लागली. आगीमुळे ऑक्सिजन पुरवठा बाधित झाल्याने उपचाराधीन एका ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. सुदैवाने उर्वरित रुग्णांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. पहाटेच्या सुमारास पुठ खुर्द येथील ब्रह्म शक्ती रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर आग लागली. सूचना मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती रोहिणीचे पोलीस उपायुक्त प्रणव तायल यांनी दिली.
(Hospital fire) रुग्णालयात कुठल्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. शिवाय आपत्कालीन स्थितीत बाहेर निघण्यासाठीचे मार्ग बंद अवस्थेत दिसून आल्याप्रकरणी संबंधीतांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे रुग्णालय बुद्ध विहार परिसरातील सर्वात जुने आणि मोठे आहे. येथे दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात. आग लागली तेव्हाही रूग्णालयात अनेक रूग्ण दाखल होते. ज्यांना काही सामान्य लोक आणि रूग्णालयातील कर्मचार्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
विशेष म्हणजे या आधी तीन रुग्णालयांमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. यापूर्वी २७ मेला दक्षिण दिल्लीतील सफदरजंग रुग्णालय तसेच पूर्व दिल्लीतील मक्कड मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे.
हेही वाचलंत का ?