दानोळी, पुढारी वृत्तसेवा: महापुराची मगरमिठी सुटल्यानंतर पूरग्रस्त भागात आता नवी समस्या उभी राहिली आहे. महापूर ओसरलेल्या भागात मगर दिसू लागल्याने नागरिकांत भीती आहे. एरवी नदीत दिसणाऱ्या मगरी आता विहिरींतही आढळू लागल्या आहेत.
शिरोळमधील कवठेसार रोडलगत असलेल्या विहरीत सहा फुटी मगर आढळली असून तिला पकडण्यात यश आले. जयसिंगपूर येथील वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांना मगर पकडण्यात यश आले.
दानोळी-कवठेसार रोड लगत बाबासाहेब जमादार यांची विहीर आहे. त्यांना काल सायंकाळी विहरीत मगर असल्याचे दिसून आले.
जमादार यांनी जयसिंगपूर येथील वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांना कल्पना दिली.
दरम्यान अभिजीत खामकर, शुभम रास्ते, साई रसाळ, सचिन सुरवसे शाहरुख मुजावर, निरंजन यादव, सुमित धोत्रे, दिलीप कांबळे,
राम पडियार आणि दानोळी चे दिवाकर तिवडे यांनी मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र, विहरीत पाणी जास्त प्रमाणात असल्याने ती बराच वेळ चकवा देत होती. त्यामुळे पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतला.
जमादार यांनी मोटरच्या सहाय्याने पहाटे पर्यंत विहरीतील पाणी उपसा केला. पहाटे पुन्हा मगर पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. पहाटे पाच वाजता ही मगर पकडण्यात यश आले.
ही मगर सहा फुटांची आहे. यावेळी हरीभाऊ जाधव, विहीर मालक बाबासाहेब जमादार, शेतकरी मोठ्या संख्येने आले होते.
सकाळी सहाच्या सुमारास मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले.
कराड तालुक्यात कृष्णा काठच्या गावांत मगरींचा वावर दिसून आला होता. शहरासह आटके परिसरात स्थानिकांना मगर दिसली होती.
त्यानंतर पुन्हा शहरासह दोन ठिकाणी मगर आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे ८ ते १० फुटाची मगरीचे नदी पात्रालगत दर्शन झाले.
महापुराच्या काळात नदीपत्रालगत वास्तव्यास आलेल्या महाकाय १२ फुटी मगरीला वनविभागाने धाडसी युवकांच्या मदतीने पकडली होती.
१२ फूट लांबीची मगर कृष्णा नदीला आलेल्या महापुरात सांगलीवाडी गावातील नागरी वस्तीत आली होती.