मुंबई, पुढारी ऑनलाईन: वाशिम येथील महामार्ग बांधकाम कंत्राटदाराला शिवसेनेचे स्थानिक नेते त्रास देत असल्याच्या आरोपांनतर शिवसेनेने नितीन गडकरींना प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या नावावर कंत्राटदारावर दहशत कुणी अन्य गाजवतोय की शिवसैनिक हे चौकशीत समोर येईल.
पण मुंबई-गोवा महामार्गावरील कामात कंत्राटदाराला काळे फासणे, उठाबशा काढायला आम्ही लावत नाही. असे करणारे तुमच्यासोबत आहेत.
ते कसे चालतात, असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम येथील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची तक्रार केली आहे.
शिवसेनेचे स्थानिक नेते कंत्राटदारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रोखा अन्यथा महामार्गाच्या कामावर गंभीरपणे विचार करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
गडकरींना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सांवत म्हणाले, गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
यात खरे काय ते बाहेर येईल. असे कृत्य करणारे खरे शिवसैनिक आहेत की उगाच आमच्यावर नावानं कुणी बोंबाबोंब करतेय ते बाहेर येईल.
परंतु शिवसेनेचा उल्लेख का करता? मुंबई-गोवा रोडच्या कंत्राटदाराला काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे,
उठाबशा काढायला लावणारी माणसं आज तुमच्यासोबत आहेत. मग तिथे का गप्प बसता?
गडकरींना प्रत्युत्तर देताना सावंत पुढे म्हणाले, 'नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. बाळासाहेब नेहमी त्यांचा गौरवाने 'रोडकरी' असा उल्लेख करत.
अलीकडे मुख्यमंत्र्यांनीही गडकरींच्या कामाचं कौतुक केले. मुख्यमंत्री नेहमी दक्ष असतात.
त्यामुळे त्यांच्या पत्राची ताबडतोब दखल घेतली आहे.
या घटनेची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत.
नितीन गडकरींबद्दल पूर्ण आदर आहे परंतु त्यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळला असता तर बरं झालं असतं. शिवसेना कधी विकासकामांना विरोध करत नाही.'