Swapnil Kusale : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत स्वप्नील कुसाळेची दोन ‘रौप्य’ पदकांना गवसणी | पुढारी

Swapnil Kusale : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत स्वप्नील कुसाळेची दोन 'रौप्य' पदकांना गवसणी

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : अझरबैजान देशातील बाकु शहरात सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा सुपुत्र स्वप्नील सुरेश कुसाळे (Swapnil Kusale) याने सलग दोन दिवसांत दोन रौप्य पदके जिंकली. त्याच्या या कामगिरीबद्दल कांबळवाडी ग्रामस्थांनी आतषबाजी करुन एकच जल्लोष केला.

गुरुवारी स्वप्नीलने (Swapnil Kusale) वैयक्तिक गटात तर शुक्रवारी सांघिक गटात रौप्यपदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज असलेला स्वप्निल प्राथमिक शिक्षक सुरेश कुसाळे यांचा सुपुत्र असून सध्या तो पुण्यात रेल्वेमध्ये टी. सी. म्हणून कार्यरत आहे.
अझरबैजान मधील विश्वचषक स्पर्धेतील या रुपेरी कामगिरीचा स्वप्नीलला २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रता फेरीमधील निवडीसाठी मोठा फायदा होणार आहे.

आखातातील अझरबैजान देशात सुरू असलेल्या या स्पर्धेसाठी पंधरा दिवसांपूर्वी स्वप्निल रवाना झाला होता. तेव्हापासून कुसाळे कुटुंबीय आणि कांबळवाडी ग्रामस्थ स्वप्निलच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून होते. या स्पर्धेतील स्वप्निलच्या रुपेरी यशामुळे कांबळवाडी गावाचे नाव आता जगाच्या नकाशावर आले आहे.

स्वप्निलचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत, तर पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण भोगावती साखर कारखान्याच्या पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. त्यानंतर नाशिकच्या भोसला मिल्ट्री अकॅडमीमध्ये शिकत असताना त्याने नेमबाजीचा सराव सुरू केला. त्यानंतर त्यांने राज्य – राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला. २०२० च्या ऑलिंपिक स्पर्धेत राखीव कोट्यातून त्याची संधी थोडक्यात हुकली होती. आता २०२४ च्या फ्रान्समधील ऑलिंपिक स्पर्धेसाठी त्याची तयारी सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button