Rafael Nadal : नदालने दिला अलेक्झांडरला आधार, क्रिडा जगतातून होतोय कौतुकाचा वर्षाव! | पुढारी

Rafael Nadal : नदालने दिला अलेक्झांडरला आधार, क्रिडा जगतातून होतोय कौतुकाचा वर्षाव!

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेनचा सुपरस्टार टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) त्याच्या 36व्या वाढदिवसाच्या दिवशी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झाला. पण दुसऱ्या सेटदरम्यान जर्मन खेळाडूला दुखापत झाली आणि त्याने सामन्यातून माघार घेताच नदालला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले. त्यावेळी नदाल ७-६, ६-६ ने आघाडीवर होता.

नदालने (Rafael Nadal) त्याच्या कारकिर्दीत 14व्यांदा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 13 वेळा त्याने अंतिम फेरीतत पोहोचून क्ले कोर्टवर विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.

झ्वेरेव्हला चालताही येत नव्हते..

उपांत्य फेरीच्या सामन्यात नदालला प्रतिस्पर्धी झ्वेरेव्हने कडवट झुंज दिली. त्यामुळे क्ले कोर्टचा बादशाह असणा-या नदालला पहिला सेट टायब्रेकरमध्ये ७-६ ने जिंकवा लागला. दुसरा सेटही ६-६ अशा बरोबरीत सुटून टायब्रेकरमध्ये गेला होता. दरम्यान, झ्वेरेव्ह एक जोराचा फटका मारताना कोर्टवर पडला. त्या घटनेने मैदानातील उपस्थित सर्वांना धक्का बसला. झ्वेरेव्हची मेडिकल टीम पटकन त्याच्याजवळ पोहचली आणि नेमके काय घडले याबाबत विचारणा केली, तेव्हा झ्वेरेव्हच्या घोट्याला दुखापत झाल्याचे समजले. झ्वेरेव्हला वेदना असहाय्य झाल्या होत्या. त्याच्या चेह-यावरून ते स्पष्ट दिसत होते. अखेर कसा बसा त्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चालता येत नसल्याने व्हील चेअरवर बसवून कोर्टच्या बाहेर नेण्यात आले. काही वेळाने तो कुबड्यांच्या सहाय्याने कोर्टवर परत आला आणि त्याने प्रेक्षकांना अभिवादन त्यांचा निरोप घेतला. त्यामुळे तो या सामन्यात पुढे खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नदालला विजेता घोषित करण्यात आले. (Rafael Nadal)

झ्वेरेव्ह मैदान सोडत असताना राफेल नदालने त्याला आधार दिला आणि काही अंतर त्याच्यासोबत तो चालत गेला. नदालच्या खिलाडूवृतीवर जागतिक क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) नदाच्या कृतीने प्रभावित झाला. तेंडुलकरने नदालच्या खिलाडूवृत्तीला सलाम करत या महान टेनिसपटूविषयी एक ट्विट करत आदर व्यक्त केला आहे. ‘नदालने दाखवलेली नम्रता आणि काळजी त्याला खूप महान आणि विशेष बनवते,’ असे तेंडुलकरने म्हटले आहे.

त्याचवेळी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही नदालवर स्तुतीसुमने उधळली. त्यांनीही एक ट्विट करून, ‘हेच कारण आहे की खेळ तुम्हाला रडवू शकतो. अलेक्झांडर झ्वेरेव्ह तू परत येशील. राफेल नदालची खेळ भावना, नम्रता आदरणीय आहे,’ असे व्यक्त केले. (Rafael Nadal)

सचिन आणि शास्त्रीच्या या ट्विटचे चाहतेही कौतुक करत आहेत. सचिनने नदालबद्दल केलेले ट्विट आतापर्यंत दीड हजाराहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. २०२२ च्या फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत नदालचा सामना आता नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी होईल, ज्याने दुसऱ्या उपांत्य फेरीत मारिन सिलिकचा ३-६, ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला.

Back to top button