गणेशमूर्ती निर्मितीला वेग… कुंभार बांधव लागले कामाला | पुढारी

गणेशमूर्ती निर्मितीला वेग... कुंभार बांधव लागले कामाला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गणेशमूर्ती साकारण्याच्या कामात कुंभार व्यावसायिक व्यस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला पूर ओसरला आहे तसेच पाऊसही थांबल्याने व श्रावण महिन्यामुळे ऊनही पडल्याने उत्साहाच्या वातावरणात मूर्ती बनविण्याच्या कामांना वेग आला आहे. कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये अद्याप बंद असल्याने कुंभार व्यवसायात आबालवृद्ध सहकुटुंब सक्रिय झाले आहेत.

गणेशमूर्ती साकारणार्‍या व्यावसायिकांच्या वसाहतींमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आल्याने शहरातील इतर विविध भागांसह कुंभार गल्ली, बापट कॅम्प या कुंभार व्यावसायिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. चार-पाच दिवसांनंतर पुराचे पाणी टप्प्याटप्प्याने उतरले. यादरम्यान इतर विविध व्यवसायांसह कुंभार व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अनेक गणेशमूर्ती बनविणारे व्यावसायिकांच्या कार्यशाळाच पुराच्या पाण्यात राहिल्याने शाडू, प्लास्टर, रंग साहित्यासह विविध यंत्रसामग्री खराब झाली होती. अनेक तयार मूर्तीही पुराच्या पाण्यामुळे खराब झाल्या होत्या. पूर ओसरल्यानंतर गेले आठवडाभर कुंभार व्यावसायिकांकडून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानंतर कार्यशाळाही सावरण्यात आल्या.

अनेक कुंभार व्यावसायिकांनी श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर गणेशमूर्ती साकारण्याच्या कामांना सुरुवात केली आहे. पुरामुळे आठ-दहा दिवस वाया गेले आहेत. गणेशोत्सवाला केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने नियोजित कामे गणेशोत्सवापूर्वी आटोपण्यावर भर असल्याने दिवस-रात्र कामे सुरू झाली आहेत. शाडूच्या आणि घरगुती गणेशमूर्तींना प्राधान्य दिले जात आहे. याचबरोबर सार्वजनिक मूर्तींचीही तयारी केली जात आहे.

Back to top button