शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवार यांना उमेदवारी निश्चित, कट्टर शिवसैनिकाला दिली संधी | पुढारी

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवार यांना उमेदवारी निश्चित, कट्टर शिवसैनिकाला दिली संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सुटल्यात जमा आहे. या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केले आहे. याची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. दरम्यान, याबाबत संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मातोश्री’वरुन अद्याप आपल्याला कोणताही निरोप आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला होता. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे निश्चित करण्यात आले आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओ‍ळखले जातात. संजय पवार यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असल्याची चर्चा राजकीय वर्तु‍‍ळात आहे.

दरम्यान, संजय पवार यांनी आपल्याला उमेदवारी मिळाली तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंगळवारी सकाळी दिली होती. माझी नावाची चर्चा सुरु आहे. पण अद्याप वरिष्ठांकडून अजून काही सूचना आलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदर असल्याचे त्यांनी म्हटले होते.

तर सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ”माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.” असे संभाजीराजेंनी म्हटले होते.

माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेकडे पाठिंबा मागितला असला, तरी शिवसेना त्यास तयार नाही. उमेदवारी हवी असेल; तर तुम्हाला पक्ष प्रवेश करावा लागेल, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे ठेवली आहे. मात्र, शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यास संभाजीराजे तयार नाहीत. त्याऐवजी शिवसेनापुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची तयारी त्यांनी दाखविली होती.

हा तिढा सोडविण्यासाठी आणि संभाजीराजे यांचे पक्ष प्रवेशासाठी मन वळविण्यासाठी रविवारी शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या, असा निरोप दिला होता; पण संभाजीराजे पक्ष प्रवेश करणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे चर्चा फिस्कटली.

हे ही वाचा :

Back to top button