मुख्यमंत्री ठाकरे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, संभाजीराजेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया | पुढारी

मुख्यमंत्री ठाकरे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, संभाजीराजेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात बोलताना मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ”माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. पुढे काय करायचं आहे ते ठरलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.” असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेकडे पाठिंबा मागितला असला, तरी शिवसेना त्यास तयार नाही. उमेदवारी हवी असेल; तर तुम्हाला पक्ष प्रवेश करावा लागेल, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे ठेवली आहे. मात्र, शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यास संभाजीराजे तयार नाहीत. त्याऐवजी शिवसेनापुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे.

संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य’ या संघटनेची घोषणा केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून पुढे राजकारण करण्याचा मनोदयही त्यांनी जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण जर शिवसेनेत प्रवेश केला, तर आताच ‘स्वराज्य’ खालसा होईल, अशी भूमिका संभाजीराजे यांच्या समर्थकांनी त्यांच्या पुढे मांडली आहे. त्यामुळे शिवसेना पुरस्कृत उमेदवार ही अखेरची तडजोड असेल; पण शिवसेना प्रवेश होणार नाही, यावर संभाजीराजे आणि त्यांच्या समर्थकांचे एकमत आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओ‍ळखले जातात. संजय पवार यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 हे ही वाचा :

Back to top button