कोल्‍हापूर ड्रेनेज : नियाेजनासाठी ४२३ कोटींची गरज | पुढारी

कोल्‍हापूर ड्रेनेज : नियाेजनासाठी ४२३ कोटींची गरज

कोल्हापूर; सतीश सरीकर :  कोल्‍हापूर ड्रेनेज : गेल्याकाही वर्षांत कोल्हापूर शहराच्या नागरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मूळ शहराच्या अनेक पटीने लोकवस्ती वाढत गेली. उपनगरांनी कोल्हापूर शहर व्यापले, तरीही सद्यस्थितीत फक्त 60 टक्के भागात ड्रेनेजलाईन अस्तित्वात आहे.

उर्वरित 40 टक्के शहरात ड्रेनेजलाईन नाही. यात ई वॉर्डसह उपनगरांचा समावेश आहे. परिणामी, शहरात शंभर टक्के ड्रेनेजलाईन पूर्ण करण्यासाठी महापालिकेला 423 कोटींची गरज आहे.

कोल्हापूर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. शहर विस्तारले; परंतु महापालिकेच्या सेवा फक्त गावठाणापुरत्याच आहेत. हद्दवाढ न झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर मर्यादा आल्या.

परिणामी, सेवा-सुविधाही मर्यादित राहिल्या. शहराचे क्षेत्रफळ 67 चौरस किलोमीटर आहे. लहान-मोठ्या सुमारे 750 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. त्यापैकी फक्त मोठ्या 285 किलोमीटरवर ड्रेनेजलाईनची सुविधा आहे.

उर्वरित भागात ड्रेनेजलाईनसाठी प्रशासन त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करत आहे. येत्या काही दिवसांत प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे निधीसाठी पाठविण्यात येणार आहे.

शहरात दुधाळी, जयंती या दोन मोठ्या नाल्यांसह प्रमुख बारा नाले आहेत. काही वर्षांपूर्वी अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाईनसाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करून पाठविला होता.

210 कोटींच्या प्रस्तावातील 70 कोटी मंजूर झाले.

त्यानुसार दुधाळी झोनअंतर्गत असलेल्या 112 कि. मी. लांबीच्या ड्रेनेजलाईन टाकणे, दुधाळी येथे 6 एम. एल. डी. सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधणे, लाईन बाजार येथे 4 एम. एल. डी. सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधणे, कसबा बावडा, राजहंससमोरील नाला, रमणमळा नाला, ड्रीमवर्ल्डजवळील नाला, लक्षतीर्थ नाला, मार्केट यार्डसमोरील वीट्टभट्टी नाला आदी नाले अडवून ते कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणे आदी कामे सुरू आहेत.

सद्यस्थितीत ड्रेनेज लाईन नसलेल्या भागात सांडपाणी उघड्यावरून वाहून ते नाल्यात जाते. तेच नाले पुढे पंचगंगा नदीत जाऊन मिसळतात.

…या भागांत अद्याप ड्रेनेजलाईन नाही

कसबा बावडा, लाईन बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी, सर्किट हाऊस परिसर, सदर बाजार, विचारे माळ, पाटोळेवाडी, मुक्तसैनिक वसाहत, जाधववाडी, बापट कॅम्प, महाडिक माळ, रुईकर कॉलनी, कावळा नाका परिसर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसर, टाकाळा, शिवाजी विद्यापीठ परिसर, सायबर परिसर, सम्राटनगर, एस. एस. सी. बोर्डचा काही भाग, आर. के. नगर, रायगड कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत परिसर आदी.

सांडपाणी अधिभाराचे कोट्यवधी रुपये जातात कोठे?

शहराच्या 40 टक्के भागात ड्रेनेजलाईन नाही; परंतु त्या ठिकाणी घर बांधत असताना महापालिका प्रशासन ड्रेनेज डेव्हलपमेंट फंड आकारते. प्रतिचौरस मीटर 75 रु. इतकी आकारणी केली जाते.

त्यातून नगररचना विभागाकडे वर्षाला सुमारे 2 ते 3 कोटी रुपये जमा होतात. आजअखेर ड्रेनेज नसलेल्या ई वॉर्डातून गेल्या 40 वर्षांत कोट्यवधी रुपये कर घेतला.

परंतु, अद्यापही त्या ठिकाणी ड्रेनेजलाईन टाकलेली नाही. घरफाळ्यातून आकारल्या जाणार्‍या मलनिस्सारण करातून सुमारे दोन कोटी व पाणी बिलातून आकारण्यात येणार्‍या सांडपाणी अधिभारातून 8 ते 10 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होतात.

शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे

लाईन बाजार : 76
दुधाळी नाला : 17
जयंती नाला : 6
लाईन बाजार : 4

महापालिकेचे कर…

ड्रेनेज डेव्हलपमेंट फंड :
प्रतिचौरसमीटर 75 रुपये
घरफाळ्यातून मल्लनिस्सारण लाभ कर : 4 टक्के
पाणी बिलातून सांडपाणी अधिभार : 10 टक्के

ड्रेनेज नसल्याचे परिणाम…

नागरिकांन सेफ्टिक टँक करावा लागतो. त्यातील मैलामिश्रित सांडपाणी गटारातून वाहते. पुढे तेच सांडपाणी नाल्यातून नदीत मिसळते. परिणामी, पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे.

ड्रेनेजलाईन नसल्याने सेफ्टिक टँकचे मैलामिश्रित सांडपाणी चर मारून सोडले जाते. सांडपाणी साठल्याने डासांचे साम्राज्य निर्माण होते. परिणामी, आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.कोल्‍हापूर ड्रेनेज साठी ४२३ कोटींची गरज

Back to top button