

वडणगे; पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता. करवीर) येथील नळ पाणी योजनेच्या उपसा केंद्रातील रायझिंग पाईपमध्ये बिघाड झाला आहे. त्यातच जॅकवेल जवळची पुराची पाणी पातळी कमी होईपर्यंत दुरूस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा बेमुदत काळासाठी बंद झाला आहे.
महापुराच्या काळात येथील जॅकवेल पाण्याखाली गेला आहे. ग्रामस्थांची गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यातच आता मोठा बिघाड झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी वडणगेकरांची अवस्था झाली आहे.
प्रयाग चिखली येथील उपसा केंद्रातून वडणगेला पाणी पुरवठा केला जातो. महापुरामुळे जॅकवेल पाण्याखाली गेल्याने २१ जुलैपासून गावाचा पाणी पुरवठा बंद झाला.
पुराचे पाणी ओसरल्यावर ग्रामपंचायतीने जॅकवेलमधील नुकसानीची पाहणी करून खराब झालेल्या मोटरची दुरुस्ती करून घेतली. पण जॅकवेलच्या तळात रायझिंग पाईपला गळती असल्याने आणखी काही दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले आहे.
येथील उपसा केंद्र दरवर्षी महापुराच्या काळात पाण्याखाली जाते. पाण्याच्या मोटरमध्ये तांत्रिक बिघाड होतो, त्यामुळे पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद राहतो.
गावाभोवती पाणी असताना, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे पुराच्या काळात 'नदी उशाला अन् कोरड घशाला' अशी येथील ग्रामस्थांची अवस्था होते.
आता पाणी ओसरल्या शिवाय पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होणार नसल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट केले असले तरी, पाण्याची कोणतीच पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काहीजण खाजगी टँकर मागवून पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत.
'महापुराने जॅकवेल पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामपंचायतीने या काळात पाण्याची पर्याही व्यवस्था करावी.'
वडणगे ग्रामस्थ
'जॅकवेलच्या तळातील पाइपमध्ये बिघाड झाल्याने तेथील पाणीपातळी कमी झाल्याशिवाय दुरुस्ती करता येत नाही. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे.'
सचिन चौगले, सरपंच