शिरोळ : मुख्यमंत्री आले आणि सहा मिनिटात गेले! पुरग्रस्तांची संतप्त प्रतिक्रिया | पुढारी

शिरोळ : मुख्यमंत्री आले आणि सहा मिनिटात गेले! पुरग्रस्तांची संतप्त प्रतिक्रिया

शिरोळ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी शिरोळ दौऱ्यावर आले खरे परंतू पूरग्रस्तांची ना व्यथा ऐकली, ना मत फक्त जाता जाता सरकार तुमच्या पाठीशी आहे. मदत करेल, एवढेच सूचक आश्वासन देऊन सहा मिनिटांत निघून गेले.

पद्माराजे विद्यालय निवारा छावनीत सकाळी नऊ वाजल्या पासून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण मारुन बसलेल्या पूरग्रस्तांच्या पदरी निराशा पडली. ठरावीक लोकांशी व प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती. तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करायची सोडून शिरोळकडे येऊन काय सार्थक केले. असा खरमरीत सवाल करून आमच्या भावना जाणून घेतल्या नाहीत, अशी संतापजनक प्रतिक्रिया पूरग्रस्त शेतकरी, नागरिक, महिलांनी दिली.

संतापलेल्या पूरग्रस्तांनी, तालुक्यातील मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावरही टीकेची झोड उठवली. नियोजन शुन्य दौरा झाल्याचे सांगत, या दौऱ्याची तुलना सन 2005 साली, महापूरग्रस्तांचे सांत्वन करायला आलेल्या काँग्रेसच्या सोनिया गांधी व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दौऱ्याशी केली.

त्याच बरोबर गुरुवारी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी शिरोळ येथे पुरग्रस्ताशी संवाद साधला. सत्तेतील सरकारवर टिका केली. याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर मिळेल, अशी अपेक्षा होती, पण ती शुक्रवारी फोल ठरली.

मुठभर पुरग्रस्त आणि ओंजळभर कार्यकर्त्यांचा गराडा, त्यामुळे पुरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचता आले नाही. या ढिसाळ नियोजनाला पोलिस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा सकाळी 10 वा. 45 मिनिटांनी शिरोळ मधून नृसिंहवाडीकडे रवाना झाला. पुन्हा 11 वा 9 मिनिटांनी शहरातील पद्माराजे विद्यालयात आगमन झाले.

याठिकाणी त्यांनी शिरटी येथील 2 शिक्षक महिलांची भेट घेऊन पुनर्वसनास तयार आहात का असा प्रश्न केला. यावेळी त्या महिलांनी होकार देताच मुख्यमंत्री 11 वा.15 मिनिटांनी कोल्हापूरकडे रवाना झाले.

यावेळी शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर पोलिस फौजफाटा तैनात केला होता. यावेळी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशिल माने यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवले असताना शुक्रवारी या निर्बंधाचे उल्लघंन झाले. कार्यकर्त्यांनी कोरोनाची ‘ऐसी की तैसी ‘म्हणत गर्दी करून गराडा घातला. यावेळी जिल्हा व तालुका प्रशासन तसेच पोलिसांनी निव्वळ बघ्याची भुमिका घेतली.

मुख्यमंत्री आम्हाला भेटतील आमच्या भावना , व्यथा ऐकून घेतील दुखःवर पांगरून घालतील, निवेदन स्विकारतील तोडगा काढतील अशी पुरग्रस्त शेतकऱ्यांसह नागरीकांची आपेक्षा होती पण यावर पाणी पडले. ठराविकच निवेदन घेवून ते परतले. काहींना तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पहायलाच मिळाले नाहीत.

हे ही वाचलत का :

हे पाहा : डिंपल को सिम्पल नहीं समझनेका ! देवमाणूस फेम अस्मिता देशमुख बरोबर खास गप्पा !

Back to top button