

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: एकाशी सौदा करून दुसर्याला मालमत्ता विक्री करून ४३ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी जळगाल येथील जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाशी सौदा करून दुसर्याला मालमत्ता विक्री केलेली घटना काल गुरूवारी उघडकीस आली आहे.
रोहन सिताराम बाहेती (वय ३३, रा. नवीपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुबोध सुधाकर नेवे यांची रिंगरोड परिसरातील मालमत्ता खरेदीसाठी त्यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये व्यवहार केला होता. ही मालमत्ता ४ कोटी ११ लाख रुपयांत रोहन बाहेती खरेदी करणार होते.
अधिक वाचा
रोहन बाहेती यांनी सुबोध नेवे यांच्या संमतीने धीरज चौधरी, अमर सतरामदास दारा व जितेंद्र घनशामदास रावलाणी यांना सहभागीदार केले होते. त्यानुसार २० फेब्रुवारी २०२० रोजी बेचेन करारनामा करण्यात आला होता. मात्र, नेवे यांनी मिळकतीची रक्कम वाढवून मागत करारनाम्यावर सही केली नाही.
दरम्यान, या व्यवहारापोटी बाहेती यांच्यासह सर्वांनी मिळून नेवे यांना एकूण ९३ लाख रुपये वेळोवेळी दिले होते. परंतु, बाहेती यांची सौदा पावती झालेली असतानाही या मिळकतीची परस्पर विक्री केली. याबाबत बाहेती यांनी विचारणा केली असता असमाधानकारक उत्तरे दिली.
अधिक वाचा
याबाबत बाहेती यांनी चौकशी केली असता नेवे यांनी संबधित मालमत्ता अमर दारा, जितेंद्र रावलाणी, सारीका रावलाणी, उषा रावलाणी व मोहित रावलाणी यांना परस्पर विक्री केल्याचे त्यांना दिसून आले.
ही मालमत्ता बाहेती यांनी खरेदी केल्यानंतर ती रावलाणी यांना खरेदी करुन देणार होते. तत्पूर्वी नेवे यांनी परस्पर विक्री केल्यामुळे बाहेती व चौधरी यांची फसवणूक झाली आहे.
अधिक वाचा
बाहेती व चौधरी यांचे दिलेले ४३ लाख रुपये देखील त्यांना परत केले नाही. बाहेती व रावलाणी यांच्यात देखील सामंजस्य करार झालेला होता असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्थानकात रोहन बाहेती यांच्या फिर्यादीनुसार काल रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अमर दारा, जितेंद्र रावलाणी, सारीका रावलाणी, उषा रावलाणी व मोहित रावलाणी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?