केंद्राने १ हजार कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी तात्काळ जाहीर करावी : ग्रामविकासमंत्री मुश्रीफ | पुढारी

केंद्राने १ हजार कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी तात्काळ जाहीर करावी : ग्रामविकासमंत्री मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : केंद्राने पूरग्रस्त भागाला १ हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाला महापुराचा मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान मोदींनी पूरग्रस्त भागाचा दौरा करावा की नाही हा त्यांचा भाग आहे. पंतप्रधान या नात्याने त्यांनी पूरग्रस्त भागाला मोठी मदत द्यावी. अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले आहेत.

यावेळी त्यांनी प्रसामध्यमांशी बोलताना भाष्य केले. पंतप्रधान मोदी पूरग्रस्त भागाला भेट देतील का नाही हा त्यांचा प्रश्न आहे.

नुकसानग्रस्त भागाला तात्काळ मदत जाहीर करावी

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे प्रचंड प्रमाणात महापुराने नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.

पंतप्रधानांनी पूरग्रस्त भागासाठी १ हजार कोटींची भरघोस मदत करावी, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

सातशे कोटी हे २०१९ च्या पुरासाठी होते. तीच रक्कम आता केंद्राने जाहीर केली आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मागचे परिपत्रक काढून बघावे.

तसेच २०१९ साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सरकारने तात्काळ पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली आहे. यावर्षी झालेल्या नुकसानीबाबत केंद्राने मदत करावी.

याचबरोबर महाविकास आघाडी सरकार सध्या ज्या भागातील पुराने बाधित झाले आहे त्याचा आढावा घेत आहे.

त्यानंतर प्रत्येकाला मदत मिळणार असल्याची ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)  यांचे आज, शुक्रवारी कोल्हापूर विमानळावर आगमन झाले. त्यानंतर ते ते मोटारीने शिरोळला रवाना झाले.

सव्वाअकरा वाजण्याचा सुमारास शिरोळ व नृसिंहवाडी येथील पूरबाधित भागाची पाहणी करणार आहेत.

1.15 वाजता गंगावेस ते पंचगंगा हॉस्पिटल परिसराची पाहणी व नंतर शिवाजी पूल येथून पूरग्रस्त भागाची माहिती घेणार आहेत.

दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनाकडून पूरस्थितीचा आढावा ते घेतील.

त्यानंतर पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता ते मुंबईला रवाना होतील.

Back to top button